विशाखा कशाळकर संपादित ‘एकांकिका’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा…
नाटक ही सांघिक कला आहे. नाटक करायचे तर टीमची गरज लागते. उपजत लेखनकला एकलव्याप्रमाणे विकसित करणाऱ्या विद्यार्थिदशेतील लेखकांना त्यांच्याजवळील उपलब्ध संस्थेत, कॉलेजात बऱ्याचदा प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. एकांकिका करणारी टीम अशा एकांड्या लेखन शिलेदारांना हेरणारच नसेल तर हे स्वयंभू एकांकिका लेखक स्वतःला पारखणार तरी कसे? हे झाले महाविद्यालयीन लेखकांचे. जुन्याजाणत्या एकांकिका लेखकांना भेडसावणारी समस्याही वेगळी नाही. एकांकिका लिहायची तर कुणासाठी ? सोबत टीम नाही… टीमशिवाय कुठेही सादर करू शकत नाही. मग अशा स्थितीत ही एकांडी लेखनकला तगणार कशी? लिहिण्याची प्रेरणा टिकून कशी राहाणार? या साऱ्या विचाराने, “विशाखा कशाळकर प्रतिष्ठान”च्या पुढाकाराने अभिनेत्री विशाखा कशाळकर यांनी कोणताही सुप्त व्यावसायिक हेतू न ठेवता निःस्पृह, पारदर्शी विचाराने ‘लेखकांसाठी खुला एकांकिका वाचन मंच’ स्पर्धा या उपक्रमाची निर्मिती केली. या उपक्रमाच्या आगळ्या वेगळ्या रूपरेषेबद्दल थोडक्यात सांगायचे तर .. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकांकिकांमधून 3 एकांकिका वाचनासाठी निवडल्या जात. प्रत्येक एकांकिका वाचनासाठी 40 मिनिटांचा अवधी तर दर एकांकिका वाचून झाल्यावर 20 मिनिटांची खुली चर्चा केली जाई. उपस्थितीत प्रेक्षक, लेखक, सन्माननीय पाहुणे सारेचजण या चर्चेत भाग घेत. सर्वोत्कृष्ट एकांकिकेची निवड करण्यासाठी पुन्हा तिन्ही एकांकिकांबाबतीत तुलना करणारी मूल्यमापन चर्चा होई. चर्चेअंती गुप्त मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखकाची निवड केली जाई. या अनोख्या प्रयोगाला, एकांकिका लेखकांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रामाणिक सातत्याची पराकाष्ठा करीत दर महिन्याला होणारा हा उपक्रम वर्षभर नेटाने चालवला गेला. सहभागी झालेल्या एकांकिकामधून दर महिन्यात 3 याप्रमाणे 12 उपक्रमात 36 एकांकिका प्रेक्षकांसमोर वाचल्या गेल्या.
विशाखा कशाळकर यांच्या या विलक्षण संकल्पनेला आणि शिस्तबद्ध, काटेकोर आयोजनाला उपस्थित प्रेक्षकांनी, मान्यवरांनी, स्पर्धकांनी भरभरून प्रेम दिले. या उपक्रमात महाराष्ट्रभरातून तब्बल १२४ नव्या संहिता या मंचासाठी लिहिल्या गेल्या यातच सर्व काही आलं. गेल्या १८० वर्षाच्या काळात मराठी रंगभूमी नवनवीन प्रयोग करत देशातील सर्वात प्रयोगशील रंगभूमी म्हणून मानाने मिरवत आहे. यातच एक छोटासा पण अतिशय महत्वाचा प्रयोग म्हणजे “विशाखा कशाळकर प्रतिष्ठान” निर्मित ‘लेखकांसाठी खुला एकांकिका वाचन मंच’ स्पर्धा. सर्वार्थाने आगळा, वेगळा कोणताही पक्षपातीपणा न करता साजरा झालेला हा रंगधर्मी उपक्रम. फक्त नवोदितांनाच नाही तर, सर्व मराठी एकांकिका लेखकांना, प्रत्येक महिन्याला ‘विनामूल्य’ मंच उपलब्ध असलेले हे एकमेव व्यासपीठ’ !!!!!
भपकेबाज सादरीकरणात हरवलेल्या ‘संहिता लेखकांना’ त्यांचे ‘मानाचे स्थान’ मिळवून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. यात भाग घेण्यासाठी विषय, शैली आणि वयाचे बंधन नव्हते. कोणतीही फी घेतली गेली नाही. प्रेक्षकांसाठीही प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता. ‘प्रतिष्ठान’चे हे पहिलेवहिले दमदार पाऊल मराठी रंगभूमीसाठी दखलपात्र झाले आहे. लेखन, वाचन, तज्ज्ञ व दर्शकांच्या उपस्थितीत चर्चा-मूल्यमापन ते १२ महिन्यातील १२ सर्वोत्कृष्ट एकांकिकांचे पुस्तक प्रकाशन..अशा ठोस योजनेचा हा भरीव उपक्रम. आधीच जाहीर केल्याप्रमाणे, दिलेला शब्द पाळत ‘विशाखा कशाळकर प्रतिष्ठान’ निर्मित ‘लेखकांसाठी खुला एकांकिका वाचन मंच’ स्पर्धेच्या पहिल्या वर्षाचे पुस्तक “एकांकिका” नावाने प्रकाशित करीत आहे. स्वतः विशाखा कशाळकर यांनीच या पुस्तकाचे संपादन केले आहे. प्रत्येक रंगकर्मींच्या संग्रही असावे असे हे एकांकिका विषयावरचे समग्र पुस्तक ‘एकांकीका’ ३० नोव्हेंबरला प्रकाशित केले जाणार आहे. दादर येथील किर्ती महाविद्यालयातील सुसज्ज सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ८:३० या वेळेत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते मकरंद देशपांडे या पुस्तक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याखेरीज मनोरंजन विश्वातील कलाकार-तंत्रज्ञही ‘एकांकिका’च्या प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. या निमित्ताने लेखन, वाचन, तज्ज्ञ व रसिकांच्या उपस्थितीत चर्चा-मूल्यमापन ते १२ महिन्यातील १२ सर्वोत्कृष्ट एकांकिका सोबतच ‘एकांकिका’ या साहित्यिक प्रकाराचे समग्र रूप या पुस्तकाला यावे म्हणून विविध मान्यवरांचे, एकांकिका विषयावरचे अत्यंत महत्त्वाचे सहा अभ्यासपूर्ण लेख यात छापले आहेत. सर्व रंगकर्मीना निमंत्रण असून या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. पुस्तक प्रकाशनच्या दिवशी विशाखा कशाळकर त्यांच्या प्रतिष्ठानातर्फे, लेखकांना सन्मान देणाऱ्या नव्या उपक्रमाची उद्घोषणा करणार आहेत. हा नवा उपक्रमही दमदार असणार आहे.