या जीवनगौरव पुरस्काराचा आनंद वेगळाच – पुरुषोत्तम बेर्डे

*या जीवनगौरव पुरस्काराचा आनंद वेगळाच – पुरुषोत्तम बेर्डे*

*विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ वितरणा प्रसंगी केले प्रतिपादन*

‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.’ कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा असल्याचं प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ वितरण प्रसंगी केले. ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंद सुद्धा आहे. अतिशय  दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आयोजित केल्याबद्दल नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे मनापासून कौतुक करत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. नुकताच १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगला. इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये सुरेखा पुणेकर (लोककला), श्रीगौरी सुरेश  सावंत ( सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) आणि ज्ञानेश महाराव  (लेखक व पत्रकार ) यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री तौफिक कुरेशी (झेंबे वादक) आणि ग्रुप पं. विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी  तसेच सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे  वंशज असलेले विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद  रसिकांनी घेतला. या बहारदार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns