स्वप्नपूर्ती तब्बल ५४ वर्षांनी. . .
कलावंत सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळा असतो असं म्हणतात, तेही खरंच आहे. तसंच कलावंत स्वप्न पाहत असतो. सिग्मंड फ्राॅईड या मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी असं म्हटलं आहे की कलावंत त्यांच्या अपुऱ्या इच्छा स्वप्नात पाहतो आणि स्वप्नातल्याच काही इच्छांना कलाकृतीच्या माध्यमातून वाट मोकळी करुन देत असतो. चित्रकार मर्दे यांच्याबाबत घडलेली एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगण्याजोगी आहे.
तेव्हा, डहाणूला प्रल्हाद मर्दे नावाचे एक चित्रकार राहतात. ते आणि मी दोघेही एकाच ठिकाणी शिकलो. आमच्या आर्टस्कूलचं नाव सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट.
चित्रकार मर्दे १९६९ साली आर्ट मास्टरची परीक्षा देण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट जात होते. त्याच वेळी २० जुलै १९६९रोजी अमेरिकेचे अपोलो-११ हे यान चंद्रावर उतरले. त्यावेळी या चित्रकाराच्या मनात असा विचार आला होता की एक दिवस भारतानं सोडलेलं चांद्रयानसुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि भारताचं यश पाहून आपली छातीही गर्वानं फुगेल… जगाकडे आपण भारतीयही ताठ मानेनं पाहायला लागू… असे विचार त्यांच्या मनात घोळत असतानाच त्यांच्या चित्राचा तोच विषय होऊन गेला आणि त्यांनी त्याच विषयावर चित्र काढले आणि त्यांनी त्या चित्राला ” Even India is waiting to touch you .” असं काही तरी नाव दिलं.
आता तुम्ही म्हणाल की हे आत्ता सांगायची गरज काय…
आपलं विक्रम लॅंडर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण धृवाकडे उतरलं… त्यातून प्रज्ञान रोव्हरनं चांद्रभूमीवर भारताची राजमुद्रा आणि इस्रोचे नाव असलेलं बोधचिन्ह उमटलेलं टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसलं तेव्हा आपण पाहिलेलं स्वप्न साकार झाल्याचा विलक्षण आनंद त्यांची पुतणी आणि माझी स्टूडेंट असलेल्या प्रियाच्या माध्यमातून त्यांनी माझ्याशी शेअर केला आणि त्यांच्या आनंदात मीही सहभागी झालो.
शेवटी स्वप्नपूर्तीचा आनंद काही औरच असतो. खरं नं…
– श्रीराम खाडिलकर.