मधुभाईंच्या पाच पुस्तकांचे २५ एप्रिलला प्रकाशन

*ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ५ पुस्तकांचे २५ एप्रिलला मुंबईत होणार प्रकाशन*

*कोकण मराठी साहित्य परिषदेकडून मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आनंदसोहळ्याचे आयोजन*

*मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती*

*मुंबई (२३ एप्रिल २०२५) :* मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे आपल्या वयाची ९५ वर्षे पूर्ण करत असून यानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात कोमसापकडून येत्या २५ एप्रिल रोजी मधु मंगेश कर्णिक यांच्या ५ पुस्तकांचा प्रकाशनसोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात शुक्रवार, २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर हे भूषवणार असून यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मधु मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकांचे प्रकाशन संपन्न होणार आहे, अशी माहिती कोमसापकडून देण्यात आली.

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात कोमसाप ही संस्था मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या प्रसार-संवर्धनासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेली कोमसाप त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच साहित्यिक व सांस्कृतिक अभिवृद्धीसाठी प्रयत्नशील राहिली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, याकरिताही मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोमसापने दीर्घकाळ पाठपुरावा केला. कोमसापच्या प्रयत्नांना यश येऊन गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला. या स्वप्नपूर्तीचा आणि संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसाचा आनंद सोहळा कोमसापकडून २५ एप्रिल रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘स्मृतिजागर’, ‘गूढ-निगूढ’, ‘स्वयंभू’, ‘राजा थिबा’ व ‘उधाण’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री उदय सामंत व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मॅजेस्टिक, मौज व उत्कर्ष या प्रकाशनसंस्थांकडून प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकांच्या प्रकाशनसोहळ्यात संगीतकार कौशल इनामदार हे मधु मंगेश कर्णिक यांच्या कवितांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमही सादर करणार आहेत. यावेळी कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज वराडे, दादर शाखा अध्यक्ष विद्या प्रभू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कोमसापकडून देण्यात आली.

………………………..

“आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ असलेले मधु मंगेश कर्णिक वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांनी सुमारे सहा दशके साहित्यसाधना केली असून कोमसापच्या माध्यमातून साहित्य व कला-संस्कृती क्षेत्रात तीन पिढ्या घडवल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोमसापने विविध माध्यमांतून अनेक वर्षे आंदोलन व पाठपुरावा केला. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून याबद्दलचा आनंदसोहळा मधुभाईंच्याच पाच पुस्तकांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्याचे कोमसापने ठरवले. त्यानुसार कोमसापच्या मुंबई जिल्हा दादर शाखेच्या वतीने या आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंदसोहळ्यात मराठीप्रेमी, साहित्यप्रेमी बंधू-भगिनींनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आहे.”
– *प्रा. डॉ. प्रदीप ढवळ*, केंद्रीय कार्याध्यक्ष, कोमसाप तथा उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

IPRoyal Pawns