*परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवा*
*– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश*
.मुंबई: राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यभरात ठीक ठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे. त्या जमिनीवर कित्येक वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करुन आपल्या ताब्यात घ्याव्यात. तेथे कुंपण भिंत करावी .तसेच आपल्या विभागाचा नाम फलक प्रदर्शित करावा व यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदाची निर्मिती करणे,वायु वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणे, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामा सह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधि व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
*परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवा*
सन 2023 पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही. यापुढे देखील या ॲप मध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणाऱ्या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष रहावे!तसेच अधिकाऱ्यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या देखील बदल्या या ॲपद्वारे होतील असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले .