दीनानाथ घारपुरे….. या चित्रपटाला मिळत आहेत 2.5 स्टार.
शिक्षण हे महत्वाचे आहे. शिक्षणाने प्रगती होते. माहीती मिळते. नवीन काही करण्यासाठी आपोआप ऊर्जा मिळते. वाचन, निरीक्षणाने माणुस प्रगलभ होतो. लहान पणा पासून शिक्षणाची – अभ्यासाची गोडी लागणे हे महत्वाचे आहे पण काही ठिकाणी ती परिस्थिती निर्माण होत नाही- कारण त्या वेळची सामाजिक/ आर्थिक परिस्थिती वेगळी असते. शिक्षणासाठी पैसा लागतो. पण मुख्य म्हणजे शिक्षण घेण्याची ईच्छा असणे गरजेचे असते. शिकायचे म्हटले कि परीक्षा आलीच, परीक्षा देण्याची वेळ आली कि अभ्यास करायलाच हवा, त्याशिवाय पर्याय नाही, पण अभ्यास न करता- पुस्तकात / गाईड मध्ये बघून पेपर सोडवला म्हणजे ‘ कॉपी ‘ करून पेपर सोडवला तर पास होणार पण पुढच्या जीवनाचे काय ? अश्याच मध्यवर्ती कलपनेवर आधारित कॉपी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
श्री महालक्ष्मी क्रिएशन ह्या चित्रपट संस्थेने ‘ कॉपी ‘ हा आशयघन असलेल्या विषयाला हात घालून त्याची निर्मिती केली आहे. चित्रपटाची निर्मिती गणेश रामचंद्र पाटील यांची असून मूळ संकल्पना त्यांचीच आहे. पलाश भीमशी वधान यांच्या भारत एक्झिम ने प्रस्तुती केली आहे. चित्रपटाला दयासागर वानखेडे आणि हेमंत धवाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. राहुल साळवे यांनी कथा लिहिली असून, संवाद लेखन दयासागर वानखेडे यांचे आहेत. गीतलेखन राहुल साळवे संगीत रोहन-रोहन वसंत कडू यांचे संगीत आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सॅनेटिओ टेझिओ यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन संदीप कुचिकोरवे यांचे आहे. याशिवाय रविंद्र तुकाराम हरळे, लीली शेख, जय घोंगे , तविंदर सिंग, साकेत चौधरी, नवनाथ गोवेकर यांचाही खूप मोठा सहभाग आहे.
या सिनेमात अंशुमन विचारे, मिलिंद शिंदे, जगन्नाथ निवंगुडे , कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, निता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापुरकर, प्रविण कापडे, श्रद्धा सावंत, प्रतीक लाड, आरती पाठक, सिद्धी पारकर, सानिका निर्मल, सिद्धी पाटणे, विद्या भागवत, शिवाजी पाटणे, आशुतोष वाडकर, पुनम राणे, अदनिश मदूशिंगरकर, प्रतीक्षा सावळे , सिकंदर मुखर्जीं, सौरभ सुतार, रमी विरकर, असे अनेक कलाकार आहेत.
या सिनेमाचा विषय हा सर्वव्यापी असा असून आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या अनेक घटनांवर भाष्य करणारा आहे. भाष्य करीत असतानाच तो शिक्षणाचे महत्व सुद्धा समजावून सांगतो. ” जो शिकला तो मोठा झाला ” मुलगी शिकली प्रगती झाली ‘ असे जरी असले तरी शालेय शिक्षणाची गोडी पहिल्या पासून लागायला हवी. ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्था कशी आहे. शाळा कश्या चालवल्या जातात. शिक्षण संस्थांचे विश्वस्त आणि मुख्यध्यापक यांची मानसिकता कशी असते ह्या सगळ्या घटनांवर सिनेमा बोलतो.
ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थी पास कोणत्या पद्धतीने होतो, ह्याचे मर्मभेदक चित्रण सिनेमात केले आहे. सिनेमाचे नाव ” कॉपी ” आहे. शाळेत विद्यार्थी शिकत असताना तो कश्या प्रकारे कॉपी करतो- त्याचे होणारे परिणाम काय आहेत हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न सिनेमात केला आहे.
गावातील अश्या पद्धतीने पास झालेल्या मुलाचा शहरात टिकाव कसा लागेल ही खंत सुद्धा प्रामाणिकपणे शिकवणाऱ्या शिक्षकांना आहे. पण व्यवस्थापन कसे असते आणि त्याचे परिणाम सहा/ सहा महिने पगार न मिळालेल्या शिक्षकाला कसे भोगावे लागतात हे दाखवले आहे. विद्यार्थी कॉपी करतो. कारण त्याला फक्त ‘पास व्हायचे असते. पुढे त्याचे नुकसान त्यालाच भोगावे लागणार आहे. त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न चित्रपट करतो.
ग्रामीण भागातील शाळा, तेथे मुलाला शिकवणारे शिक्षक, शाळेत येणारी मुले ह्यांच्यावर शाळेच्या कारभारावर, शिक्षकांच्या वर्तवणुकीवर आणि मुलांच्या पालकांच्या मानसिकतेवर हा चित्रपट प्रामाणिकपणे भाष्य करतो. प्रिया प्रकाश, शिवा ही तीन मुले शाळेत शिकत असतात. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी. पण तिघांना शिक्षण घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात. त्या समस्या शाळेमधून येतात. तर कधी घरामधून येतात पण त्यांची जिद्द शिक्षण घ्यायची असते. शेवटी त्यांचे शिक्षण पूर्ण होते कां ? कि होत नाही ? शाळेचा कारभार कसा असतो ? शाळेचे मुख्याधापक शिक्षण संस्थेचे विश्वस्त शिक्षकांना कशी वागणूक देतात ? इत्यादी प्रश्नावर हा चित्रपट भाष्य करतो.
दिग्दर्शक दयासागर वानखेडे / हेमंत धवाडे यांनी चित्रपट बंदिस्तपणे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुडे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, नीता दोंदे, भक्ती चव्हाण, प्रतीक लाड, अदनेश मदशिंगरकर , श्रद्धा सावंत, प्रतीक्षा सावळे, इत्यादी कलाकारांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिलेला आहे. चित्रपटाचे संगीत छायाचित्रण ठीक आहे. चित्रपटाचा विषय हा प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावेल. एकंदरीत ” कॉपी ” चे भवितव्य प्रेक्षकच ठरवतील.