*अभिजीतला ‘अमोल’ साथ*
*’सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत.*
चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात पाहायला मिळणार आहे. महाराजांचा जावई म्हणजेच सुरेश या गायकाच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते अमोल बावडेकर दिसणार आहेत. अभिनय आणि गायन असे दोन्ही प्रांत गाजविणारे अमोल बावडेकर सुरेश या भूमिकेच्या माध्यमातून आपल्या आवाजातील आणि मनातील सुंदरतेचा शोध घेण्याचा प्रवास उलगडून दाखविणार आहेत.
पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १२ जूनला देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे.
आपल्या या भूमिकेविषयी बोलताना अभिजीत सांगतात, ‘कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते’. ‘सुंदर मी होणार’ नाटकात काम करायला मिळाल्याचा आनंद आहे, त्यातही महाराज (संस्थानिक) यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. अभिनेता म्हणून ही भूमिका समाधान देणारी असल्याचेही अभिजीत यांना वाटते. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं अमोल बावडेकर आवर्जून सांगतात.
या दोघांसोबत आस्ताद काळे, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर यांच्या भूमिका आहेत. निर्माते करण देसाई आणि आकाश भडसावळे सांगतात, ‘‘एक अभिजात कलाकृती पुन्हा रसिकांसमोर सादर करणे आमच्यासाठी एक जबाबदारीच आहे. अभिजात कलाकृती पुन्हा पहायला मिळणे हे अगोदरच्या पिढीतील प्रेक्षकांसाठी स्मरणरंजन असेल तर नव्या पिढीला जुन्या कलाकृतींचे सामर्थ्य यामुळे अनुभवता येईल’’
‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा विषय हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आहे. भारतातील राजघराणी, संस्थाने पूर्णपणे खालसा झाल्यानंतरच्या बदलाचा सर्वांना जबरदस्त फटका बसला होता. काहींनी काळाप्रमाणे स्वतःला बदलून घेतले, तर काहींनी सत्ता नसताना सुद्धा त्याच तोऱ्यात, अवेशात राहणे कवटाळले होते. या नाटकातल्या महाराजांनादेखील हा सत्ताबदल मान्य नाही. त्यांच्या नाहक तोऱ्याचा, खोट्या अवसानाचा त्यांच्या चार मुलांवर परिणाम झालेला आहे. त्यांच्या स्वतःचे असे अस्तित्वच त्यामुळे दाबले गेले आहे. आजूबाजूच्या अशा अनेकांच्या पायात, कधी दृश्य तर कधी अदृश्य मानसिक पारतंत्र्याच्या बेड्या पडलेल्या आपण पाहतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी भान यावं लागतं. हे भान आल्यावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करतो आणि यात प्रत्येक पात्राला आपापला जगण्याच्या सुंदरतेचा मार्ग सापडतो. हे पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून आपल्या लेखन समर्थ्याने अधोरेखित केलं आहे.
नाटकाचे संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. नाटकाचे व्यवस्थापन नितीन नाईक यांचे आहे. नाटकाचा पुण्यातील शुभारंभ १२ जून या दिवशी होणार असून मुंबईत १३ जून आणि नाशिक येथे २२ जून असे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.