त्या त्या काळात रंगभूमीवर येऊन गेलेल्या अनेक अजरामर नाट्यकलाकृती स्मरणरंजनाच्या पुनःप्रत्ययाच्या आनंदासोबत काहीतरी विचार देऊ पाहण्याच्या उद्देशाने नव्याने रंगभूमीवर येत असतात. याच मांदियाळीतलं प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेलं आणि डॉ. श्रीराम लागू, शांता जोग, अशोक सराफ या दिग्गजांच्या अदाकारीने गाजलेलं ‘हिमालयाची सावली’ हे नाटक नवीन संचात लवकरच रसिकांसमोर येत आहे. १९७२ मध्ये हे नाटक सर्वप्रथम रंगभूमीवर आलं होतं. आता तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा हे नाटक नाट्यरसिकांच्या रंजनासाठी दाखल होणार आहे. प्रकाश देसाई प्रतिष्ठान (पाली) व अद्भुत प्रॉडक्शन्स निर्मित व सुप्रिया प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे प्रस्तुतकर्ते गोविंद चव्हाण व प्रकाश देसाई असून नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. नुकतीच या नाटकाची पत्रकार परिषद संपन्न झाली पत्रकार परिषदेला उपस्थित प्रा. वसंत कानिटकर यांचा नातू अंशुमन कानेटकर यांनी यावेळी ‘हिमालयाची सावली’ च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं या आशयाचं हे नाटक जुन्या काळाची एक रम्य मुशाफिरी ठरणार आहे. त्या काळातील दिग्ग्जांनी गाजवलेलं नाटक आम्हाला करायला मिळणं हे आमच्या प्रत्येकासाठी भाग्याचं असून आता या नाटकाला योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याची भावना निर्माते, दिग्दर्शक तसेच कलाकार व्यक्त करतात. मूळ संहितेशी प्रामाणिक राहून नाटकाला न्याय देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक राजेश देशपांडे सांगतात.
नव्या संचामध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारणार असून त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडेकर, ओमकार कर्वे, कृष्णा राजशेखर, प्रकाश साबळे, मकरंद नवघरे, रुतुजा चीपडे, पंकज खामकर यांच्या भूमिका आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार २९ सप्टेंबरला नाशिक येथील ‘कालिदास’ नाट्यगृहात होणार आहे. तर पुढील प्रयोग खालील प्रमाणे
सोमवार ३० सप्टेंबर दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर, दादर,
मंगळवार १ ऑक्टोबर रात्रौ ८.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
बुधवार २ ऑक्टोबर सायं. ५.०० वा. यशवंतराव चव्हाण, कोथरूड
शुक्रवार ४ ऑक्टोबर दुपारी ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली