नाटक जिवंत ठेवण्यासाठी तरुण पिढीची गरज –
– नाटककार प्रशांत दळवी.
‘संज्या छाया’ नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग उत्साहात…
(नाटकाचे पुस्तकही प्रकाशित…)
एखादे नाट्यगृह कोट्यवधी रुपये खर्च करून बांधणे सोपे आहे; पण एखादे नवीन नाटक लिहिणे त्यापेक्षाही अवघड आहे. हे अवघड काम नाटककारांच्या सध्याच्या तरुण पिढीने केलेले आहे. मराठी नाटक जिवंत ठेवायचे असेल, तर अशा तरुण पिढीची आपल्याला गरज आहे, असे मत नाटककार प्रशांत दळवी यांनी व्यक्त केले. प्रशांत दळवी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी त्यांनी हे मत मांडले.
यावेळी नव्या पिढीचे नाटककार प्राजक्त देशमुख, नीरज शिरवईकर, स्वरा मोकाशी, कल्याणी पाठारे व आदित्य मोडक यांच्या हस्ते ‘संज्या छाया’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पॉप्युलर प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘जिगीषा’ व ‘अष्टविनायक’ या नाट्यसंस्थांची निर्मिती असलेल्या, ‘संज्या छाया’ या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाला नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. वैभव मांगले व निर्मिती सावंत यांच्यासोबत सुनील अभ्यंकर, योगिनी चौक-बोऱ्हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.