सचिन चिटणीस….,,,,⭐⭐⭐⭐
वाघ नखांची कमाल ‘शेर शिवराज’
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतर ‘शिवराज अष्टका’तील ‘शेर शिवराज’हे चौथे पुष्प.
नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखं खुपसून पोट फाडून त्याचा वध केला होता. याच कथेचा संदर्भ देत ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची सुरुवात होते. अफजल खान किती क्रूर होता याचं चित्रण करणाऱ्या घडामोडी दाखवत हा चित्रपट सुरू होतो. भले आपल्याला लहानपणापासून अगदी शाळे पासून अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला हे माहीत होते. पण महाराजांकडे असलेल्या सैनिकां पेक्षा कितीतरी जास्त व बलाढ्य सेना घेऊन अफजलखान महाराजांना पकडण्यासाठी येतो तेव्हा महाराज मुत्सद्दीपणाने आपल्या कुशल बुद्धीच्या जोरावर आपल्या मावळ्यांचा जीव धोक्यात न टाकता युद्धकौशल्य, रणनिती, आयुर्वेदाचा अभ्यास, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फारच उत्कृष्टपणे चित्रपटात मांडला आहे.
चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात जेव्हा समोर येतो, तेव्हा अक्षरश: अंगावर काटा येतो. महाराजांच्या स्वभावातील प्रत्येक पैलू त्याने त्याच्या अभिनयात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळ्यांची विशिष्ट फौज होती. त्याप्रमाणे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडे ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची विशिष्ट फौज आहे. यातील प्रत्येक कलाकार त्याला दिलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय देताना दिसतो. त्यातही ‘शेर शिवराज’मध्ये चिन्मयसोबतच स्वत: दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले, आस्ताद काळे, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, मृण्मयी देशपांडे आणि वर्षा उसगांवकर यांनीही दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. अफजल खानाच्या भूमिकेसाठी अभिनेते मुकेश ऋषी यांची केलेली निवड अतिशय समर्पक.
चित्रपटाची लांबी अजून २० मिनीटांनी कमी करता आली असती तर बहार अली असती तसेच व्हीएफएक्स च्या महाजालात अजूनही चित्रपट थरारक करता आला असता जे साऊथ वाले सध्या हा फंडा आजमावत आहेत. पुढील ४ चित्रपटात प्रेक्षकांना व्हिएफक्स तंत्रज्ञान वापरून चित्रपट अधिक प्रभावशाली करता येईन याचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नक्कीच विचार करतील याची खात्री वाटते.