लेखक : श्रीराम खाडिलकर
पृथ्वीवरच्या स्वर्गातला विघ्नहर्ता
विघ्नहर्ता श्री गणेशाची काही देवस्थानं काश्मीर खोऱ्यात आहेत. त्या देवस्थानांच्या ठिकाणी पूर्वीच्या तुलनेत अलीकडे लोकांची ये-जा वाढली आहे. त्याला कारण केंद्र सरकार काश्मीरचा प्रश्न कल्पकतेनं हाताळत आहे. काश्मीर मधल्या आणि दुसऱ्या भागातून काश्मीरमध्ये येणाऱ्या
लोकांना सुरक्षित वाटण्याजोगं वातावरण सध्या असल्यानं गणेश मंदिरांमधली गजबज वाढली आहे.
अगदी काही दिवसांपूर्वीची बातमी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की की काश्मीरच्या श्रीनगर मधल्या अत्यंत मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या लाल चौकात एक हनुमान मंदिर आहे आणि त्या हनुमान मंदिरात गेली 24 वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात आहे याच ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांना तिथे बसवली जाते त्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिकृती भेट देण्यात आली. याचा अर्थ त्या भागात अत्यंत उत्तम सुरक्षा आहे आणि लोकांना तिथे निर्भयपणे वावरता येत आहे या गणेशोत्सवानिमित्त तिथे मंदिरात दर्शन घेणारे अनेक काश्मिरी खुश आहेत असं तिथल्या बातम्यांवरून लक्षात येतं.
पहलगाम जवळ मामलाका गावात राखाडी रंगाच्या दगडात बांधलेलं एक गणेशमंदिर आहे. हिमालयाच्या कुशीत असलेलं हे सुंदर वातावरणातील देवस्थान विलक्षण शांत परिसर असलेलं आहे. या ठिकाणालाही भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
काश्मीरच्या खोऱ्यात श्रीनगर या राजधानीच्या हब्बा कदल भागात गणपत्यार मंदिर आहे. झेलम नदीच्या पात्रात सापडलेली ही गणपतीची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आली. सुमारे 200 वर्षांपूर्वीचं हे गणपती मंदिर आहे. हा गणपती सिद्धीविनायक म्हणून ओळखला जातो. आपल्या अनेक प्राचीन धार्मिक आणि अन्य साहित्यातही या मंदिराचा उल्लेख आहे. खरंतर याच परिसरात एका ठिकाणी बौद्ध मठ सुद्धा अस्तित्वात होता आणि म्हणूनच चिनी प्रवासी तिथे भेट देत असत आणि त्यांच्या डायऱ्यांमध्ये या गणपत्यार मंदिराचा स्पष्ट उल्लेख आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अतिरेकी कारवाया सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी दरवर्षी २५ ते३० हजार भाविक भेट देऊन गणेशाचे दर्शन घेत होते.
यंदाच्या गणेशोत्सवाचं विशेष म्हणजे यंदा श्रीनगरच्या या मंदिर परिसरात शांतता असल्यामुळे अनेक भाविकांनी आपापल्या दीड दिवसाच्या गणपतींच्या मूर्तींचं विसर्जन सुमारे चौतीस वर्षांनी प्रथमच झेलम नदीमध्ये केलं. पुण्या-मुंबईसारख्या यंदा प्रथमच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकाही काढल्या गेल्या.
याशिवाय जम्मू मध्ये पृथ्वीराज मार्केट भागात महा गणेश मंदिर नावाचं एक मंदिर आहे सुमारे 300 वर्षांहून अधिक पुरातन मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने तिथे येत असतात सुमारे पाच फूट उंचीची ही गणेश प्रतिमा आहे त्यामुळेच त्याला महागणेश असं म्हटलं जातं.
गणपती हा विघ्नांचा नाश करणारा देव म्हणून ओळखला जातो. काश्मीर खोऱ्यात बऱ्याच वर्षांनी या गणरायाचा उत्सव मोठ्या आश्रद्धेने आणि शांततेत पार पडला विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या सावता शिवाय हा उत्सव झाला आणि जनतेला असं वाटायला लागलं की हा विघ्नहर्ता असंच उरलेलं संकटही दूर करेल आणि आपल्याला पुन्हा पूर्वीसारखं सुखा समाधानच आयुष्य काश्मीर खोऱ्यात जगता येईल शेवटी काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात तो अनुभव आता पर्यटकांना परत यायला लागला आहे. ही गणरायाचीच कृपा म्हणायची.
———————————————————————