लेखक : श्रीराम खाडिलकर
राजस्थानी गणेश
महाराष्ट्रात गणपती हे दैवत घराघरात आपल्याला दिसतं. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही या दैवताचे उपासक असून ते त्यांच्या पद्धतीनं गणरायाला चित्रात किंवा शिल्पात दाखवतात. असो. शेवटी भक्ताच्या मनातली त्याची प्रतिमा त्याच्या खऱ्या श्रद्धेचं दर्शन घडवत असते. रुप पाहता लोचनी अशा ओळी भक्तांच्या ह्रदयातल्या भावनाच व्यक्त करत असतात.
छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी बांधलेल्या आणि जिंकलेल्या किल्ल्यांच्या भव्य प्रवेशद्वारांवर या विघ्नहर्त्याची शेंदूर लावलेली प्रतिमा हमखास आपल्याला दिसते. पेशवाईत तर गणरायाला अनन्यसाधारण महत्त्व लाभलं होतं त्याची झलक आपल्याला आजही पुण्यामध्ये पाहायला मिळते.
राजस्थानच्या किल्ल्यांमध्ये आणि तिथल्या राजवाड्यांमधल्या विशिष्ट दालनांच्या दरवाजांवर गणरायाला विशेष स्थान दिलं गेलेलं दिसतं. या मजकुरा सोबत असलेला फोटो राजस्थान मधल्या बुंदी या शहरातल्या डोंगरावर असलेल्या भव्य दिव्य आलिशान राजवाड्याच्या एका दालनाच्या दरवाजावर असलेल्या कमानी खालच्या त्रिकोणी जागेमध्ये दिसणाऱ्या गणपतीचा आहे. महाराष्ट्रात गणपती मोदकासह दाखवला जातो. मात्र, देशाच्या अनेक भागात मोदकाऐवजी त्याच्या हातात आपल्याला लाडू दिसतो. प्रत्येक संस्कृतीच्या वेगळेपणाचं हे दर्शन लक्ष वेधून घेणार असतं.
आपल्याकडे गणेशासोबत रिद्धी आणि सिद्धी अशा दोघीजणी काही ठिकाणी दाखवल्या जातात. मात्र राजस्थानमधल्या बुंदी या संस्थानाच्या राजघराण्याच्या मालकीच्या राजवाड्यातल्या एका प्रवेशद्वारावर काढलेले गणपतीचं रुप राजस्थानी संस्कृतीशी मिळतं जुळतं आहे. त्या भागात कृष्णभक्ती अधिक होत असल्यामुळे या चित्रातल्या गणपतीला तिथल्या संस्कृतीचे संदर्भ ओघानंच आले आहेत. कृष्णाचं उपरणं दोनही बाजूला अंगापेक्षा बाहेर आलेलं असतं तेच या ठिकाणी गणेशाच्या बाबतीत आपल्याला दिसतं. कृष्णाच्या अवतीभवती गोपिका दाखवल्या जातात तसंच या चित्रात गणेशाच्या दोन्ही दिशांना दोन सेविका दाखवल्या आहेत त्यातली एक सेविका गणपतीला पंख्याने वारा घालते आहे आणि दुसरी सेविका गणरायासाठी हातातून काहीतरी घेऊन आल्याचं या चित्रात दिसतं. इतकंच नाही तर या चित्रात गोपिकांबरोबरच गाई आणि वासरं यांचंही दर्शन आपल्याला घडतं. हा सगळा माहोल राजस्थानी संस्कृतीला शोभून दिसावा असाच आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या राजस्थानी रूपाचं दर्शन घडवलं गेलं आहे. गणरायाच्या अवतीभवती विविध आकाराची लहान मोठी रोपटी उगवलेली दाखवली असून अशा भवतालाच्या मध्ये कमलासनावर पद्मासन घालून गणपती बाप्पा बसलेला दाखवला आहे. त्याच्या एका हातात त्रिशूल असून दुसऱ्या हातात लाडू भरलेलं ताट आहे. तर समोरच्या दोन हातांपैकी उजव्या हातात पवित्र ग्रंथ असून डाव्या हातात जपाची माळ दाखवली आहे. आणि तिथेच खाली चित्रात आपल्याला उंदीरही बघायला मिळतो. गणपतीचं हे राजस्थानी रूप आपल्याला नक्कीच भावतं. सुपासारखे कान, उजवीकडे वळवलेली सोंड आणि भक्तांकडे पाहणारा हा गणराय हे सगळं त्याचं रुप कौतुक करावं असंच आहे.
——————————————————————–