लेखक : श्रीराम खाडिलकर
मुंबईकर आणि खडकातले गणपती
गणेशोत्सवाचं आणि मुंबईचं वेगळं नातं आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं आणि तेव्हापासून सार्वजनिक रूपात गणेशोत्सव साजरा व्हायला लागला. आज या उत्सवाला काहीअंशी व्यावसायिक उलाढालीचं केंद्र असं स्वरुप आलं आहे. याचं कारण मुळातच गणपती हे दैवत असंख्य सर्वसामान्य मुंबईकरांचं अनेक वर्षांपासून श्रद्धास्थान आहे. मुंबई ज्या काळात बेटांचा समूह अशा भौगोलिक रचनेत अस्तित्वात होती तेव्हापासून गणराया विघ्नहर्त्यावर मुंबईकरांची अपार श्रद्धा आहे. तेव्हापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात गणपतीचं पूजन केलं जात आलं आहे. ही परंपरा अनेक वर्षांची आहे. म्हणूनच मुंबई आणि मुंबई जवळच्या परिसरामध्ये गणपतीच्या प्रतिमा आणि त्याचबरोबर त्याची पुरातन देवालयं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या कल्पनेतही नसेल अशा काही जागी या गणेश प्रतिमा आहेत. यातल्या नैसर्गिक खडकात कोरलेल्या फक्त तीन गणेश प्रतिमा कुठे आणि कशा आहेत हे आपण पाहू या.
अगदी साधं उदाहरण पाहा. मुंबईपासून जवळ समुद्रात लाॅंचनं प्रवास करुन एलिफंटा म्हणजेच घारापुरी बेटावर जातात. मज्जा करतात, ही फूडचा आनंद घेऊन मुंबईला परततात. एलिफंटा बेटावरच्या लेण्यात असलेलं
जगप्रसिद्ध त्रिमूर्ती शिल्प किती जणांनी पाहिलं असेल याबद्दल शंकाच आहे. असो. काही जणांनी ते एकदाच काय पण, अनेकदा पाहिलं असेल असं आपण मानलं तरीही या लेण्यांमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दुतर्फा भरपूर खांब असलेला तसंच भल्यामोठ्या आकाराची शंकराची शिल्पं भिंतीत कोरलेला एक भव्य सभामंडप दिसतो. यातल्या
एका खांबावर म्हणजे खांबाच्या कोपऱ्यावर गणेश प्रतिमा आहे. मंदिर या अर्थाने तिचं रीतसर पूजन मात्र केलं जात नाही. केवळ एक शिल्प एवढंच या गणेशाचं अस्तित्व आहे. इतर ठिकाणी गर्दी करून रांगा लावून गणेशाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांना या गणेशाचं महत्त्व का लक्षात आलं नाही याचं कारण समजू शकलेलं नाही. त्यामुळे एलिफंटा बेटावरच्या तिथल्या लेण्यांमध्ये असलेल्या एका खांबावरचा गणपती गंध फुल शेंदूर याशिवाय केवळ एक छोटेखानी शिल्प (सोबतचा फोटो पाहा) म्हणून आपण नक्कीच पाहू शकतो.
आता या लेण्यांचं विशेष म्हणजे पोर्तुगीजांनी या लेण्यांची प्रचंड प्रमाणात नासधूस केली. त्यात या गणेश प्रतिमेलाही इजा पोहोचली तरीही ज्या अवस्थेत ही प्रतिमा आहे ती पाहता आपल्या मनातली गणेश भक्ती नक्कीच जागी होऊ शकते.
मुंबईच्या उपनगरात गुहेतली आणखी एक गणेश प्रतिमा आपल्याला दिसते ती जोगेश्वरीच्या लेण्यांमध्ये अंधेरी पूर्वेला होली स्पिरिट हॉस्पिटलवरून पुढे गेल्यावर जोगेश्वरीची लेणी आपल्याला दिसतात. पूर्वी तिथे गर्दुल्यांचे अड्डे होते. आज मात्र त्या लेण्यांच्या जवळ पर्यंत वस्ती गेल्यानं तिथल्या लेण्यांमधल्या गणेश प्रतिमेचं दर्शन आपल्याला सहज घेता येतं. या गणेशाला शेंदूर लावून लावलेला असल्यानं तो सहज दिसतो. शिवाय तिथे अलीकडे पूजाअर्चाही व्हायला लागली आहे.
जोगेश्वरीहून पुढे गेल्यावर बोरिवली पश्चिमेला असलेल्या कोळीवाडा भागात वजीरा नाका आणि डॉन बॉस्को या दोन बस स्टॉपच्या मध्ये एका तळ्याच्या काठावर अतिशय पुरातन गणेश मंदिर आहे. या गणेशाचं विशेष असं की तिथं असलेल्या नैसर्गिक खडकातच याचं कोरीव काम केलं गेलं आहे. अत्यंत देखणी मूर्ती आणि कोरडा शेंदूर असं त्यांचं वैशिष्ट्य आहे.
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातल्या मुंबईकरांना अशा या गणेश प्रतिमांचा फार मोठा आधार आणि एक हक्काचं विश्वास वाटावं असं श्रद्धास्थान म्हणून वेगळं महत्त्व आहे.