मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद
बालपणापासून मराठमोळ्या वातावरणात वाढलेला, मराठीवर नितांत प्रेम करणारा, मराठीशी नाळ जोडलेला अभिनेता विनय आनंद मराठीसोबतचे ऋणानुबंध आणखी दृढ करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीत एंट्री करत आहे. आजवर बऱ्याच हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसलेला विनय आनंद लवकरच ऑनलाईन या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
विनयने आज मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं असलं तरी त्याची दुसरी ओळख म्हणजे तो सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. १९९९पासून अभिनयात सक्रिय असणाऱ्या विनयने मराठमोळ्या महेश कोठारे दिग्दर्शित ‘लो मै आ गया’ या हिंदी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एंट्री केली आहे. त्यानंतर ‘सौतेला’, ‘माई के कर्ज’, ‘सेन्सॅार’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’, ‘अंगार – द फायर’, ‘मुलाकात’, ‘जहां जाईएगा हमें पाईएगा’, ‘कूल नहीं हॅाट है हम’ या चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. खूप मोठा चाहतावर्ग लाभलेल्या विनयने बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून ऑनलाईन या आगामी मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. यात विनय कोणत्या भूमिकेत दिसणार? त्याच्या जोडीला कोणते कलाकार असणार? चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार? या आणि अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. संगीतातही विनयनं योगदान दिलं आहे. त्याने भजनांसोबतच गणपतीची गाणीही गायली आहेत. त्याची बरीच गाणी युट्यूबवर उपलब्ध आहेत.
मराठीत एका चांगल्या विषयावर चित्रपट येत असल्याने यात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं विनयचं म्हणणं आहे. याबाबत तो म्हणाला की, ऑनलाईन सिनेमाची स्क्रिप्ट आवडली म्हणून करत आहे. यासाठी माझी निवड केल्याबद्दल निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो. मी दादा कोंडके, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खूप मोठा फॅन आहे. आपल्या पाहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये केलं त्यावेळी आई अंबाबाईचे दर्शन घेतले तो माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण होता. मराठी चित्रपट फक्त महाराष्ट्रात पाहिला जात असूनही धडाकेबाज बिझनेस करत आहे. हाच चित्रपट जर जगभर पाहिला गेला तर आणखी खूप चांगला व्यवसाय करेल. मराठी सिनेमा सर्वदूर पोहोचावा हि इच्छा असल्याने हे पाऊल उचललं आहे. राज साहेब ठाकरे यांनी मराठी चित्रपटांसाठी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. यासाठी त्यांना धन्यवाद देतो असंही विनय म्हणाला.