‘सुभेदार… गड आला पण…’
सचिन चिटणीस…
या चित्रपटास मिळत आहेत 3 स्टार.
शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचा सरदार ते सुभेदार हा प्रवास, महाराज व स्वराज्या बद्दल असलेली अढळ निष्ठा ‘सुभेदार… गड आला पण…’ या चित्रपटात रेखाटण्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यशस्वी ठरले आहेत.
या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं यथार्थ दर्शन घडवणारा आहे. त्या काळातील आजूबाजूची सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग ‘सुभेदार’मध्ये आहेत. जना गराडीण (अलका कुबल) या भाबड्या स्त्रीच्या बोलण्यातून छत्रपती शिवाजी महाराज कसे त्यांच्या गड-किल्ल्यांविषयी महत्त्वाची भूमिका घेतात हे दाखवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून परतल्यानंतर आऊसाहेब आणि त्यांची अत्यंत भावनिक व हृद्य भेट दर्शवणारा प्रसंग डोळ्यांच्या कडा ओलावणारा आहे. प्रत्यक्ष सिंहगडाची भौगोलिक माहिती आणि सिंहगड का जिंकायला हवा याची विविध कारणं या चित्रपटात विस्तृतपणे मांडण्यात आली आहेत.
अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची भूमिका सशक्तपणे साकारली आहे. जिजाऊंच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर यांनी आणि तान्हाजीरावांच्या व्यक्तिरेखेतील अजय पूरकर यांनी आपापल्या व्यक्तिरेखेच्या वयातील विविध टप्पे उत्तमरीत्या सादर केले आहेत. या सर्वच मातब्बर कलाकारांच्या कसदार अभिनयाची छाप या चित्रपटावर उमटल्याचं पाहायला मिळतं. उदयभान राठोडच्या भूमिकेत दिग्विजय रोहिदास हा नवीन कलाकार लक्ष वेधून घेतो. दिग्विजय जरी नवोदित असला तरी उदयभानच्या व्यक्तिरेखेत कुठेही नवखेपणा जाणवणार नाही अशा तऱ्हेने त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. उदयभान या व्यक्तिरेखेच्याही विविध बाजू या चित्रपटात आहेत.
सिंहगडावर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे प्राणपणाने लढत असताना ते कधी विजयी होतात याची छत्रपती शिवराय राजगडावर आतुरतेनं वाट पाहात असलेल्या प्रसंगाची भावनिक किनारही यात आहे. राजांच्या बाहुंमध्ये सुभेदार प्राण सोडतात तो अतिशय रोमांचक आणि हेलावून टाकणारा क्षणही यात आहे. याखेरीज अन्य तांत्रिक बाजूही लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. एकूणच सुभेदार तानाजीराव मालुसरे या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण धांडोळा घेणारा हा चित्रपट आहे. यातील तान्हाजीरावांच्या प्रशासकीय व कुटुंबवत्सल रुपासोबत त्यांच्यातील योद्धाही मनात खोलवर ठसतो आणि कायमचा स्मरणात राहणारा ठरतो.
सुभेदार तानाजीराव मालुसरे व महाराजां मधील भावनिक नात आपण लहानपणापासून ऐकत आलोय. वाचत आलोय. त्यामुळे ही गोष्ट पडद्यावर कशी साकार होतेय, हीच खरी उत्सुकता होती, पण गोष्ट रंजक असूनही कथेचा जीव लहान असल्याने कथेचा विस्तार करण्यात चित्रपट खूप लांबल्याने पकड सैल होते आणि सुभेदार संपल्यावर या चित्रपटाचा प्रभाव तितकासा राहत नाही. मध्यंतराआधी सिनेमाचा वेग संथ आहे, गाणी गुणगुणावी किंवा लक्षात राहावी इतकी प्रभावी झाली नाहीत.
शेवटची तान्हाजी आणि उदयभान यांच्यातली लढाई मात्र अंगावर रोमांच उभे करते. चित्रपटातील काही अनावश्यक प्रसंगांची काटछाट केली असती तर चित्रपट अधिक प्रभावी झाला असता. वेगळं काहीतरी पाहण्याच्या अपेक्षेने जाल तर सुभेदार तुमची निराशा करेल. पण ऐतिहासिक सिनेमे पाहण्याची आवड असलेल्यांनी सुभेदार एकदा पाहायला काही हरकत नाही
*कलाकार*
आऊसाहेब: मृणाल कुलकर्णी
शिवाजी महाराज : चिन्मय मांडलेकर
सोयराबाई : नूपुर दैठणकर
तान्हाजी मालुसरे : अजय पूरकर
शेलार मामा : समीर धर्माधिकारी
सूर्याजी : अभिजीत श्वेतचंद्र
सावित्री : स्मिता शेवाळे
पार्वतीबाई : उमा सरदेश्मुख
रायबा : अर्णव पेंढरकर
यशोदा: शिवानी रांगोळे
येसाजी कंक : भूषण शिवतरे
मोरोपंत : श्रीकांत प्रभाकर
बाजी जेधे : बिपीन सुर्वे
जनागराडीण : अलका कुबल
शेलार : मा.राजदत्त
शेलार मुलगी : ऐश्वर्या शिधये
हिरोजी इंदुलकर : सौमित्र पोटे
पीलाजी नीळकंठ : संकेत ओक
बाजीपासलकर : सुनील जाधव
जानोजी: मंदार परळीकर
जीवा : विराजस कुलकर्णी
रंभाजी : अजिंक्य ननावरे
उदयभान : दिग्विजय रोहिदास
कुबादखान : रीषी सस्केना
अचलसिंह : ज्ञानेश वाडेकर
केसर : मृण्मयी देशपांडे
बहिर्जी : दिग्पाल लांजेकर
विश्वास : आस्ताद काळे
नवलाजी : पूर्णानंद वाडेकर