‘मी वसंतराव’ मनाला आनंद देणारी कलाकृती
सचिन चिटणीस…….
( या चित्रपटाला मिळत आहेत ४ स्टार ) ****
चित्रपट चांगला आहे हे आपण केव्हा म्हणतो, तर त्यात मनोरंजन असेल, डोक्याला उगाच ताप नसेल, त्यातील गाणी मनाला सुखावणारी असतील
…..वगैरे…. वगैरे. पण मग आपण चित्रपट उत्तम आहे असे केव्हा म्हणतो तर ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बघितल्या नंतर, एक उत्तम कलाकृती ठाशीव बांधणी तब्बल ३ तास आपल्याला सुरांच्या मैफिलीत बांधून ठेवते आणि चित्रपट संपल्यावर एक संपूर्ण देहाला आत्मिक समाधान मिळाळ्याची जाणीव होते.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पंडित वसंतराव देशपांडे यांच्या सांगितिक प्रवासाविषयाची माहिती दिली आहे आणि त्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खडतर प्रवासाची जोड कमालीच्या ताकतीने पेश केली आहे. दिग्दर्शकाने पंडितजींच्या शास्त्रीय संगीताने नटलेल्या बंदिशी असो, वा चित्रपटातील भावगीत असो, नाट्यगीत असो वा लावणी सादर करण्याची कला असो या प्रत्येक अंगाचा चित्रपटात खुबीने उपयोग करून घेतला आहे.
माझी पहिली गुरू ही माझी आईच आहे कारण मी तिच्या पोटात असल्यापासून संगीत ऐकत आलो आहे हे सांगणे तर, गुरु शंकरराव सप्रे, उस्ताद अमन अली खान पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून गायनाचे बाळकडू घेतले.
‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने वसांतरावांना प्रसिद्धीच्या उंबरावर नेऊन ठेवलें मात्र तिथं पर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता, पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित या नाटकाचा शेवट न पटल्याने व तसे दारव्हेकरांना स्पष्ट बोलून दाखवल्याने वसांतरावांना या नाटकातून काढून टाकण्यात येते मात्र शेवटी लेखकाला वसंतरावांचे पटल्याने शेवट बदलण्यात येतो व त्याचे परिणाम आपण सगळेच जाणतो.
वसंतरावांच्या जीवनात त्यांच्या मैत्री मुळे त्यांना झालेला फायदा यात नमूद केला आहे. या चित्रपटाची गोष्ट म्हणजे अनेक संकटांवर, अपमानांवर, अडथळ्यांवर, आपल्या जिद्दीने मात करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.
या चित्रपटातील संवाद रसिकांवर छाप सोडतात “असं गावं लोकांसमोर की लोकांनी शब्दच विसरावे, स्वतःचा आवाज विसरावा, असं गावं की विचारकरणच विसरावं”
माझे घराणे हे माझ्या पासूनच सुरू होते हे ठामपणे सांगणे तर दारिद्र म्हणजे काय तर “आपल्याला गायचं असतं मात्र लोकांना ऐकायचं नसतं” ही खंत हृदयाला बोचणे.
वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांचे नातू राहुल देशपांडे यांनी उत्तमरीत्या साकारली आहे. डावा डोळा लवतोय बाई ही लावणी गाताना राहुल देशपांडे यांनी जो अभिनय केलाय त्याला तोड नाही एका सेकंदासाठी असे वाटते की हा अभिनेता आहे की गायक.
अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपटाच्या संगीताचीही जबाबदारी सांभाळली आहे. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची भूमिका अमेय वाघ यांनी उत्तम साकारली आहे. पुष्कराज चिरपुटकर (पु. ल. देशपांडे), अनिता दाते (वसंतरावांची आई) यांनी कमालच केली आहे खास करून तंबाखू खाण्याची पद्धत उत्तमच, कौमुदी वालोकर (वसंतरावांची पत्नी), दुर्गा जसराज (बेगम अख्तर) एकूणच सगळ्याच कलाकारांनी आपापली भूमिका चोख पार पडल्याने चित्रपट ३ तासाचा व २२ गाण्यांचा असूनही उत्तम झाला आहे याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या कडे जाते