माणुसकी जपण्याचा प्रयत्न ‘भिरकीट’
अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटात राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी, विनोद असे मनोरंजनाचे एक परिपूर्ण पॅकेजच पाहायला मिळते. मुळात या चित्रपटात गावातील राजकारण दाखवण्यात आलं असलं तरी हा काही राजकीय चित्रपट नाही. ही एका गावातील गोष्ट आहे. गावामध्ये एक अशी घटना घडते, ज्याचा प्रभाव गावातील प्रत्येक व्यक्तीवर पडतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जी धडपड, धमाल सुरु असते, ती म्हणजे ‘भिरकीट’. आता ती नेमकी घटना कोणती, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
माणसातील माणूसपण हरवत चाललं आहे. आपल्या आयुष्यात सर्वांमध्ये एक ‘भिरकीट’ असते. आनंद असो वा दुःख ‘भिरकीट’ आपल्या मागे लागतंच. विशेषतः ‘भिरकीट’ हा शब्द खेडेगावात सर्रास वापरला जातो. ‘भिरकीट’ हे आपल्या मागे लागलेल एक अदृश्य शस्त्र आहे. या चित्रपटात ‘भिरकीट’ मागे लागल्यावर कशी मजा येते, हे दाखवण्यात आलं आहे. हा एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट असून हा चित्रपट मातीशी जुळलेला आहे. माणूस हा माणसापासूनच लांब होत चालला आहे. हा संदेश हा चित्रपट देतो.
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी यांनी ‘तात्या’
हे, नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जात असणारे पात्र रंगवले आहे. गावातील प्रत्येक स्त्री तिची व्यथा घेऊन ‘तात्या’कडे सोडवायला जाते. असा हा सदैव सेवेसाठी तत्पर असणारा ‘तात्या’ प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवतो. याव्यतिरिक्त हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, तान्हाजी गालगुंडेही आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना हसवतात.
या चित्रपटातील प्रत्येक विनोदवीराची अनोखी विनोदशैली आहे. त्यांच्या हसवण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे हसवण्याचे आपापले वेगळे टाईमिंग आहे आणि हे असे वेगवेगळे विनोदवीर एकत्र ‘भिरकीट’मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
यात तानाजी गालगुंड आणि मोनालिसा बागल ही नवीन जोडी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल हे कलाकार आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वर आणि वाई येथील जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले असून छायाचित्रकाराने प्रत्येक फ्रेम अगदी सुंदररित्या चित्रित केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा संपूर्ण चित्रपट पाहताना आल्हाददायक वाटेल हे निश्चित.
प्रेक्षक ज्यावेळी विरंगुळा म्हणून चित्रपटगृहात एखादा चित्रपट पाहायला जातो, तेव्हा त्याला निव्वळ मनोरंजन हवे असते, अशा वेळी ‘भिरकीट’ त्यांच्या या अपेक्षा पूर्ण करेल. प्रेक्षक केवळ हसणारच नाही तर त्यातून एखादा संदेशही घेऊन जातील.”