*सचिन चिटणीस……..या चित्रपटाला मिळत आहेत 4 स्टार*
भव्य, दिव्य, 3D ची कमाल आणि अफाट सुंदर रंगलेला शेवट आपण जणू शिवकालीनच होऊन जातो. हे मी म्हणतोय ते ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाबद्दल.
इतिहासावरील चित्रपट ‘झाले बहू होतील बहू’ परंतु पहिला 3D ऐतिहासिक चित्रपटाचा मान तानाजीला मिळतो आणि याचा पुरेपूर फायदा घेत दिग्दर्शकाने चित्रपटाचे सोने केले आहे.
लढाईची दृशे इतकी बेमालूम व अंगावर काटा आणणारी बनली आहेत की प्रेक्षक अचंबित होवून जातो.
२१ व्या शतकात आपण एक सर्जिकल स्ट्राईक झालातर खुश होवून जातो मग विचार करा १६ व्या, १७ व्या शतकात जेव्हा कोणतेही आधुनिक साधन नसताना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी काही मोजक्याच सैन्यासह कोंढाणा किल्ला पुन्हा शिवाजी महाराजांना मिळवून देण्यासाठी औरंगजेबच्या सैन्याची व उदयभान सारख्या कोंढाणा किल्ल्याच्या किल्लेदाराची दाणादाण उडवून दिली तेव्हा त्या मावळ्यांना काय करावे लागले असेल हे फक्त शिवाजी महाराज व स्वराज्यसाठी काहीही करावयास तयार असणारेच करू शकतात. म्हणूनच घरात मुलगा रायबाचे लग्नकार्य असतांना देखील स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तानाजी मालुसरे तयार होतात आणि कोंढाणा आपल्या मावळ्यांच्या साथीने परत स्वराज्यात आणतात मात्र त्यासाठी त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते आणि म्हणूनच त्यांच्या गौरवार्थ महाराज म्हणतात ¬‘गड आला पण सिंह गेला’ आणि कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवतात.
चित्रपटात दिग्दर्शकाने क्लोजअप शॉट सुंदर चित्रित केले आहेत. सुरवातीची खिंडीतील लढाई डोंगरावरून दोरखंडाच्या सहाय्याने अतिशय चपळपणे उतरणारे मावळे हा सीन भलताच साहसी झाला असून इथे प्रेक्षकांतून टाळ्या व शिट्या पडतात. संवाद अतिशय जोशपूर्ण झाले आहेत कोंढाणा परत आणण्यासाठी तानाजी मालुसरे व शिवाजी महाराजां मधील संवाद लाजवाब.
त्याच प्रमाणे उदयभानला भगव्याचे महत्व सांगतांना तानाजी मालुसारेंच्या तोंडी असलेले “भगवा, जिसका ऐलान खुद भगवान करता हैं, एक सुबह सुरज उगनेके बाद और शाम सुरज डुबते समय” हे संवाद जोश निर्माण करतात.
चित्रपटाची शेवटची वीस मिनटे तर प्रेक्षक आपणहूनच मावळा झालेला असतो व 3D इफ्फेट मुळे अंगावर येणारा प्रत्येक गनीम हा आपणच कापला पाहिजे या अविर्भावात असतो.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगण याने जोश्यात रंगवली आहे. डोळ्यातील धार, चेहऱ्यावरील राकटपणा त्याने उत्तम वठवला आहे, तर सैफ अली खानचा खुनशी विनोदाची धाक असलेला उदयभान तोडीसतोड, काजोल खूप फ्रेश व सुंदर दिसली आहे.
लेखक प्रकाश कपाडिया व ओम रावूत यांनी लेखनाची बाजू पक्की केली आहे, किको नाकाहारा यांचे छायादिग्दर्शन उत्तम, पार्श्वसंगीत मस्त जमून आले आहे. शरद केळकर या गुणी अभिनेत्याने शिवाजी महाराज अतिशय संयमी रंगवले आहेत जे या चित्रपटाच्या गोष्टीला अतिशय अनुरूप ठरले आहे. अजिंक्य देव, देवदत्त नागे, शशांक शेंडे, कैलाश वाघमारे व भारत संगानी उत्तम.
शेवटची २० मिनिटे चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः तोंडात बोट घालावयास लावतो आणि तानाजी व उदयभान यांच्यातील लढत तर चित्रपटाला चारचांद लावते.