दीनानाथ घारपुरे……..
संगीत रंगभूमीची परंपरा खूप मोठी आहे. अनेक नामवंत कलाकार संगीत रंगभूमीने दिले. संगीत नाटक ही महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली एक बहुमूल्य देणगी आहे. आजपर्यंत ह्या रंगभूमीवर विविध प्रयोग सादर झाले. अनेक विविध विषयावरची नाटके ह्या रंगभूमीवर रसिकांसाठी सादर केली. रसिकांनी त्याचा आस्वाद मनमुरादपणे घेतला. संगीत रंगभूमीची प्रेरणा घेऊन नारायणराव जाधव, जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव या तीन कलाकारांनी १ ऑक्टोबर १९४९ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर ” मराठी रंगभूमी पुणे ” या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी पहिला प्रयोग ” संगीत सौभद्र ” चा केला. तेव्हापासून आजतागायत ” मराठी रंगभूमी ” ही संस्था सातत्याने संगीत नाटके सादर करीत आहे. आतापर्यंत मराठी रंगभूमी या संस्थेने १९ पारंपारिक नाटके आणि २४ नवीन नाटके सादर केली.
संगीत ययाती आणि देवयानी हे नाटक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिले, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी या मधील पदाला स्वरसाज चढवला, संगीत आणि शब्द यांचा सुरेख संगम ह्या नाटकात पहायला मिळतो. अर्थात शब्दांचे सौंदर्य आणि नाट्यगीताचा अभिजात स्वरसाज ह्या दोन्ही गोष्टी या नाटकात अनुभवायला मिळतात. नाट्यनिर्माते गोपीनाथ सावकार यांनी हे नाटक रंगभूमीवर सादर केले होते. त्यावेळी त्या नाटकामध्ये कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार यांनी देवयानी आणि शर्मीष्ठा या भूमिका साकारलेल्या होत्या. त्यावेळी रामदास कामत यांनी ‘कच ‘ ची भूमिका आणि मा. दत्ताराम यांनी ययाती ची भूमिका केली होती.
ह्या नाटकाची गोडी अजूनही ताजी आहे. आणि म्हणून हे नाटक नवीन पिढीने सादर करावे असे कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार म्हणजे दीप्ती भोगले यांना वाटले. आणि त्यांनी हे नाटक आता ” मराठी रंगभूमी पुणे ” ची युवापिढी कडून रंगमंचावर आणले आहे,,,,. या नाटकाचे दिग्दर्शन दीप्ती भोगले यांनी केल असून कीर्ती शिलेदार यांनी संगीत मार्गदर्शन केले आहे. आजही हे नाटक बघत असताना आपल्याला मूळ प्रयोगाची आठवण होते.
मराठी रंगभूमी, पुणे निर्मित गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट प्रकाशित संगीत ययाती आणि देवयानी चा प्रयोग सादर केला. लेखन वि.वा. शिरवाडकर, दिग्दर्शन दीप्ती भोगले, संगीत – पंडित जितेंद्र अभिषेकी, संगीत मार्गदर्शन- कीर्ती शिलेदार, कलाकार- शर्मिष्ठा ( स्नेहल नेवासकर ) देवयानी ( श्रद्धा सबनीस) विदुषक ( सुदीप सबनीस) ययाती ( निनाद जाधव ) यती ( निरंजन कुलकर्णी ) कच ( चिन्मय जोगळेकर ) यांनी भूमिका केल्या. संगीतसाथ संजय गोगटे, भास्कर पेठे, , परेश पेठे, विद्यानंद देशपांडे, ध्वनिसंयोजन सुधीर ठाकूर, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा/ वेशभूषा सयाजी शेंडकर यांनी सांभाळली आहे,,,
या नाटकात माणसाच्या वृत्तीचा संघर्ष मांडला आहे. पराक्रमात आणि उपभोगात जीवन सफल झाले आहे असे मानणारा ययाती त्याची अवस्था पाप आणि पुण्य यांच्या संघर्षात सापडलेली असून तो प्रतिष्ठान ह्या राज्याचा सम्राट आहे. देवयानीचा ” कच ” बरोबर प्रेमभंग झालेला असल्याने ती नागिणीसारखी चवताळलेली आहे. त्याचबरोबर ती दानवांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या असून तिच्या अंगात अहंकार पुरेपूर भरलेला आहे.. कच हा बृहस्पती यांचा पुत्र. देवांच्या संरक्षणाकरता त्याला संजीवनी विद्या मिळवायची आहे. त्यासाठी तो शुक्राचार्य यांच्या आश्रमात कष्ट करीत असतो. शर्मिष्ठाची व्यक्तिरेखा ही आगळी वेगळी आहे. स्वकुळाचा नाश होऊ नये म्हणून तीने देवियानीची दासी होण्याचे मान्य केले आहे., ती राजकन्या आहे., अशी ही भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखा एकत्र येतात आणि मग संघर्षाला सुरुवात होते. प्रेम हे आंधळे आहे असे म्हणतात, स्वार्थासाठी लोक प्रेम करतात, प्रेम हे वरदान आहे असे ही म्हटले जाते, प्रेमाचे विविध पैलू ह्या नाटकात पहायला मिळतील.
दीप्ती भोगले हिने नाटक सुंदर बसवले आहे. या नाटकातील गाणी ही सुमधुर आहेतच. निनाद जाधव, स्नेहल नेवासकर, सुदीप सबनीस, श्रद्धा सबनीस, निरंजन कुलकर्णी, चिन्मय जोगळेकर यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. एक सुमधुर संगीत नाटक बघितल्याचे समाधान मिळेल.