सचिन चिटणीस, या चित्रपटाला मिळत आहेत अडीच स्टार
“आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा”
सम्या-सायली या एका यंग कपलच्या आयुष्यात आनंदाची बातमी येते. सायली गरोदर होते. त्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीला एक वेगळंच वळण येतं. पुढे ते दोघे डॉक्टरांकडे जातात तेव्हा त्यांना समजतं की त्यांना एक नाही दोन नाही तर एकाच वेळी चार मुलं होणार आहेत. त्यामुळे दोघांनाही आनंद होतो आणि धक्का देखील बसतो. त्यांच्या या प्रेग्नंसीच्या प्रवासाची एक गंमतीदार गोष्ट म्हणजे ‘एक दोन तीन चार’
आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला जिओ स्टुडिओज निर्मित आणि वरुण नार्वेकर दिग्दर्शीत गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, हा चित्रपट असून या चित्रपटात दिग्दर्शकाने हसत खेळत नवदांपत्याने मुल संगोपनाचा मंत्रच दिला आहे.
चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे कोणकोणत्या वळणावर जातं याची हिंट हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला येते.
वयाच्या २३ व्या वर्षी सम्या आणि सायली या जोडप्याच लग्न झालंय, पण त्यानंतर लगेचच गोड बातमी सुद्धा येते. आणि ह्या गोड बातमीव्दारे जो एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय त्याने त्यांची जी तारांबळ उडते याची एक धमाल गोष्ट यात पहायला मिळते.
पण चित्रपटाच्या शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन प्रेक्षकांची विकेटच घेतली आहे. आता यांना चार का सहा याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
वैदेही परशुरामी आणि निपूण धर्माधिकारी अभिनित ही नवी गोड जोडी या अनपेक्षित सरप्राईझला कसे सामोरे जाणार हे बघणं प्रेक्षकांसाठी गमतीदार ठरणार आहे.
हा चित्रपट जितका यंग जनरेशन साठी आकर्षक आहे तितकाच तो सर्व कुटुंबासाठी सुद्दा एक मेजवानी ठरणार आहे. कारण प्रत्येक जोडप्याबरोबर सर्व कुटुंबच या प्रवासात सहभागी होत असतं.
मुख्य म्हणजे सोशल मीडियाचे आजचे भारताचे नावाजलेले स्टार्स करण सोनावणे आणि यशराज मुखाटे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. करण पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. तर यशराज मुखाटे एक म्युझिक डिरेक्टर म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करतो आहे.
चित्रपटाची वनलाइन मस्त असून सुरुवातीला दिलेले काही धक्केही सुखद आहेत, मात्र चित्रपटाला जी किती हवी ती गती न मिळाल्याने चित्रपट संथ झाला आहे. वैदेही परशुरामी आणि निपूण धर्माधिकारी ही मिस मॅच जोडी जुळवण्यामागील हेतू समजला नाही. गाण्यांमध्ये ज्याप्रकारे सुरेख संकलन करण्यात आलं, तसं इतर दृश्यांमध्येही अपेक्षित होतं. ऋषिकेश जोशी वडिलांच्या भूमिकेत शोभत नाही. वैदेही परशुरामीने साकारलेल्या सायलीमध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. वेगवेगळ्या छटा असलेलं हे कॅरेक्टर तिने सुरेख साकारलं आहे. निपुणने तिला चांगली साथ दिली असली तरी दोघांची केमिस्ट्री कुठेही जाणवत नाही. निपुणच्या संवादफेकीच्या वेगळ्या शैलीमुळे बऱ्याचदा हसू येतं. मृणाल कुलकर्णीच कॅरेक्टर छोर्ट असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. करण सोनावणेने रंगवलेला मित्रही छान झालाय. वडिलांच्या भूमिकेत ऋषिकेशकडून नेहमीपेक्षा वेगळ्या अभिनयशैलीची अपेक्षा होती. शैला काणेकर आणि सतीश आळेकरांनी आपल्या व्यक्तिरेखा नेटकेपणाने साकारल्या आहेत.