लेखके लेखकु गौरविला, गौरव शब्दांचाच जाहला
अवघा आनंद सोहळा.
लिहित्या हातांनी लिहित्या हातांना गौरवणे ही
संकल्पनाच फार जिव्हाळ्याची आणि हृद्य.
*गंगाराम गवाणकर यांना ‘मानाचि’चा ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ प्रदान* ‘मानाचि संघटनेचा’ ८ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न
मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या ‘मालिका नाटक चित्रपट’ अर्थात मानाचि लेखक संघटनेचा आठवा वर्धापन दिन नुकताच रवींद्र नाट्य मंदिरमधील मिनी थिएटरमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार व पटकथाकार गंगाराम गवाणकर यांना ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘मानाचि’ने केलेला गौरव म्हणजे लेखकांनी लेखकाचा केलेला सन्मान असल्याची भावना व्यक्त करताना ही खूप मोठी दाद असल्याचेही गवाणकर म्हणाले. गवाणकरांवर पहिलं प्रेम करणाऱ्या मैसम्मावर रचलेल्या कवितेने त्यांनी आपल्या मुलाखतीची सांगता केली.
याखेरीज ‘प्रस्थान’ या प्रायोगिक नाटकासाठी मकरंद साठे, ‘३८ कृष्ण व्हिला’ या व्यावसायिक नाटकासाठी श्वेता पेंडसे, ‘कुर्रर्र…’ या नाटकातील गीतासाठी तेजस रानडे, ‘फनरल’ चित्रपटाच्या कथेसाठी रमेश दिघे, ‘वाय’ चित्रपटाच्या पटकथेसाठी अजित वाडीकर व स्वप्नील सोज्वळ, ‘मीडियम स्पायसी’ चित्रपटातील संवादांसाठी इरावती कर्णिक, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील गीतांसाठी गुरू ठाकूर, ‘जीवाची होतीया काहिली’ मालिकेच्या कथेसाठी सुबोध खानोलकर, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या पटकथेसाठी अमोल पाटील, ‘तुमची मुलगी काय करते’ व ‘आई कुठे काय करते’ या मालिकांच्या संवादलेखनासाठी मुग्धा गोडबोले, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या गीतासाठी अभिषेक खणकर, ‘कस्तुरीगंध’ या स्तंभलेखनासाठी प्रा.विजय तापस यांना मानाचि पुरस्कार प्रदान करण्यात आले. खालिदा शेख, अभिराम रामदासी, रूपाली चेऊलकर, संदीप गचांडे व ईश्वरी अतुल यांना लक्षवेधी लेखनासाठी सन्मानित करण्यात आले.
नेहमीच आपल्या अनोख्या शैलीत विनोदाचे चौकार-षटकार मारणाऱ्या भरत दाभोळकरांनी ‘वस्त्रहरण’बाबत आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मी आजवर इंग्रजीमध्ये ३२ नाटकं लिहिली आहेत. यात इंग्रजीमध्ये तमाशा, लावणी, पोवाडा, कव्वाली केली. त्याचा मला खूप अभिमान होता. पॅरडीच्या या अभिमानात मी खूप वर्षे जगलो. कोणीतरी कारण नसताना मला ‘वस्त्रहरण’ बघायला घेऊन गेलं आणि त्या दिवशी मला पॅरडीची लेव्हल काय असते हे समजलं. त्यानंतर गवाणकरांचं कोणतंही नाटक बघितलं नाही. कारण मला आणखी इन्फेरीआॅरीटी कॅाम्प्लेक्स (न्यूनगंड) वाढवायचा नव्हता. गवाणकरांची एक मुलाखत बघितली होती. ज्यात ते म्हणाले होते की, त्यांच्या नाटकाला पु.ल.देशपांडे आले होते. पुलं म्हणाले होते की ‘वस्त्रहरण’ नाटक बघण्यापेक्षा काम करायला मला जास्त आवडेल. तो अनुभव मलाही आला. एका प्रयोगात मी, विजू खोटे, विहंग नायक या सर्वांनी गेस्ट अपिरीयन्स केला होता. गवाणकरांनी यापुढेही खूप वर्षे लिहित राहावं असंही दाभोळकर म्हणाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गुरू ठाकूर म्हणाले की, इथे बसल्या-बसल्या दोन ओळी डोक्यांत आल्या. एखाद्या अस्सल गवयाने दुसऱ्याच्या गाण्याला दाद देणं हे जितकं दुर्मिळ आहे तितकंच लेखकानेही लेखकाचं कौतुक करणं आहे. मला काही लेखकांचे कॅाल्स येतात. मला एखादी हुकलाईन आवडली तर सांगतो की हे हिट आहे गाणं… यातून मला सुचलं की, आपण सर्व लेखणीची लेकरं असल्यानं बहिणाबाई म्हणाल्या की, माझी माय सरस्वती… त्यामुळे आपली माय एकच असल्याने सहोदर भेटल्याची भावना आता या क्षणी माझ्या मनात आहे. ‘भेटी लागी आले शब्दांचे सोयरे, कौतुकाची दारे उघडली… गुरू म्हणे मानू कुणाचे आभार, सारे सहोदर भोवताली…’ अशा शब्दांतून आपल्या भावना व्यक्त केल्या.