‘यदा कदाचित रिटर्न्स’ मध्ये संतोष साकारणार ८ भूमिका
लेखक-दिग्दर्शक संतोष पवार आता ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर घेऊन येत आहे. ‘सोहम प्रॉडक्शन्स’ निर्मित व ‘भूमिका थिएटर्स’ प्रकाशित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग, १२ मे रोजी दुपारी ४.३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष पवारचे आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना व संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य या नाटकाला लाभले आहे.
विशेष म्हणजे, या नाटकात संतोष पवार ८ वेगवेगळ्या भूमिका रंगवत आहे. त्याच्यासह १३ तरुण कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. संतोष पवारने ४ वर्षांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर आणले होते; परंतु त्या नाटकाच्या निर्मात्यांच्या निधनामुळे हे प्रयोग थांबले. त्यावेळी या नाटकाचे १७४ प्रयोग झाले होते. आता संतोष पवार पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे.
या नाटकाच्या निमित्ताने मानसी केळकर या निर्माती म्हणून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या नाटकाची गोष्ट आवडल्याने मी या नाटकाची निर्मिती करत आहे. संतोष पवार यांच्यावर असलेला विश्वास, त्यांचे लेखन व दिग्दर्शन; तसेच उत्तम कलावंत हे आमच्या नाटकाचे बलस्थान आहे. नाटकाची स्क्रिप्ट खूप छान आहे आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे, असे मनोगत मानसी केळकर यांनी या नाटकाविषयी संवाद साधताना मांडले.
‘यदा कदाचित रिटर्न्स’ जेव्हा चार वर्षांपूर्वी आले, तेव्हा ते खूप जोरात चालले होते. अक्षरशः हाऊसफुल्लचे बोर्ड लागत होते. अचानक कोरोना आला आणि आमची नाट्यसृष्टी थांबली. त्याचप्रमाणे आमच्या निर्मात्यांचे निधन झाले. १७४ प्रयोग आमचे तोपर्यंत झाले होते. आता पुन्हा हे नाटक करण्यासाठी चांगले निर्माते आवश्यक होते आणि मानसी केळकर यांच्या निमित्ताने ते आम्हाला साध्य झाले आहे, असे मत संतोष पवार याने व्यक्त केले.
छायाचित्र – प्रातिनिधिक