सांस्कृतिक कलादर्पण’चा रौप्य महोत्सवी पुरस्कार सोहळा
१९९८ साली नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, पत्रकारिता अशा कलाक्षेत्रातील गुणीजनांचा सन्मान करण्यासाठी ‘संस्कृती कलादर्पण’ या नावाची संस्था चंद्रशेखर सांडवे यांनी स्थापन केली. सुरूवातीपासूनच या संस्थेला नाटक, चित्रपट, मालिका क्षेत्रातील कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अल्पावधीतच ‘संस्कृती कलादर्पण’च्या पुरस्कारांना कलाक्षेत्रात मानाचं स्थान लाभलं.
चंद्रशेखर सांडवे हे या ‘संस्कृती कलादर्पण’चे एकमेव अध्वर्यू होते.
या पुरस्कार सोहळ्यामागचं अर्थकारण ते एकट्यानं सांभाळत होते. त्यात आतबट्ट्याचाच व्यवहार अधिक होता. पण कलेवरचं त्यांचं प्रेम, निष्ठा यामुळेच ते हा ‘पुरस्कार सोहळा’ दरवर्षी नेटानं, पण भव्यतेनं आणि कल्पकतेनं सादर करीत आले.
‘संस्कृती’ला नवं ‘सांस्कृतिक’ रूप देऊन ‘सांस्कृतिक कलादर्पण’ असं नामाभिधान करून त्याच ऊर्जेनं कलासेवा पुढं सुरू ठेवली आहे.
यंदाचं ‘सांस्कृतिक कलादर्पण’चं हे २५वं वर्ष म्हणजे ‘रौप्य महोत्सवी’ वर्ष आहे. यावर्षी चंद्रशेखर सांडवे ह्यांनी नाटक, चित्रपट, मालिका, लघु चित्रपट, प्रसार माध्यमं अशा सकल कला क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्याचं योजिलं आहे. या साऱ्या मनोरंजन, कला क्षेत्रातील गुणीजनांची नामांकनंही जाहीर करण्यात आली आहेत. शिवाय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि कुमार सोहोनी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार-समीक्षक अरूण घाडीगावकर यांना, सर्वोत्कृष्ट पीआरओ (प्रसिद्धीप्रमुख) पुरस्कार अमृता माने यांना, सर्वोत्कृष्ट मार्केटिंग प्रमुख पुरस्कार विक्रम क्रिएशन यांना तर सर्वोत्कृष्ट कामगार पुरस्कार प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील संतोष भोईर यांना जाहीर झाला आहे.
‘सांस्कृतिक कलादर्पण’चा रौप्य महोत्सवी पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दिनांक ५ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वा. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे साजरा करण्यात येणार आहे.