लेखक : श्रीराम खाडिलकर
राजा रविवर्मा आणि गणपती
गणपती हा देव एकच असला तरी त्याची नेहमीच वेगवेगळी
रुपं आपल्याला दिसतात. कारण, गणराय विघ्नहर्त्याची प्रतिमा प्रत्येक कलाकार त्याच्या मनातल्या प्रतिमेप्रमाणे घडवत असतो. व्यक्ति तितक्या प्रकृती असं आपण जे म्हणतो ते हेच.
गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच त्याच्या छापील रंगीत चित्रांचं पूजनही आपल्याकडे अनेकजण करतात. प्रख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यानंही गणपतीची काही चित्रं काढली होती. हा एक असा चित्रकार होता की त्यानं काढलेली कॅनव्हासवरची तैलरंगातली अनेक सुंदर चित्रं राजे-महाराजे आणि अनेक धनिकांच्या संग्रहात होती. हीच चित्र कमीतकमी पैशात सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी या चित्रांच्या रंगीत प्रती छापल्या गेल्या. लिथोग्राफ आणि ओलिओग्राफ अशा दोन प्रकारची ही चित्रं होती. याच छापील चित्रांमुळे राजा रविवर्मा यांची चित्रं देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या घरा-घरात जाऊन पोहोचली आणि तुफान लोकप्रियही झाली.
राजा रविवर्मा हा असा भारतीय चित्रकार होता की ज्यानं देवांना समकालीन संस्कृतीमधल्या माणसांच्यासारख्या वस्त्रांमध्ये, त्यांच्यासारख्याच दागदागिन्यांमध्ये चित्रात दाखवलं.
हिंदुंच्या मानसिकतेचा त्यांनी अंदाज घेतला होता. धार्मिक आणि पौराणिक प्रसंगांवर आधारलेली चित्रे काढून त्यांनी सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. एकाच देवाची विविधता असलेली रुपंही रविवर्मा यांनी वेगळेपण अधिक खुलून दिसेल अशा पद्धतीनं चित्रात उतरवली. म्हणजे असं की शंकर, पार्वती आणि बाल रुपातला गणपती तसंच या तिघांच्या बरोबर शंकराचं वाहन असलेला धष्टपुष्ट नंदीही ठळकपणे दाखवला. यातल्या शंकराला छान पैकी मिशा दाखवल्या आहेत. यामुळे शंकराच्या कुटुंबाचंच फोटोजेनिक चित्रण आपल्याला पाहता आलं. (याच मजकुरासोबत शंकर-पार्वतीच्या कुटुंबाचा राजा रविवर्मा यांनी काढलेला ओलिओग्राफ दिसत आहे. असे ओलिओग्राफ आज काही लोकांच्या खाजगी संग्रहात आहेत.)
एका चित्रात उंदराला वाहन बनवून त्यावर बसून गणपतीची स्वारी निघाली आहे असंही पाहायला मिळतं. अशा चित्रांमुळे सर्वसामान्य लोकांच्या अभिरुचिचा दर्जाही नकळतपणे उंचावला गेला. गणपतीचं आणखी एक वेगळं चित्रही लक्षणीय ठरलं. प्रौढ वयातला सिंहासनावर विराजमान झालेल्या गणपतीच्या सोबत त्यांच्या एका बाजूला रिद्धी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी दाखवल्या आहेत. याशिवाय ऐन तारुण्यातलं गणपतीचं रुप असलेलं आणखी एक स्वतंत्र चित्रही काढून सर्वसामान्य लोकांना गणपतीच्या रुपाची मनपसंत निवड करण्याची संधीही दिली. आता अशा चित्रांमध्ये त्या काळात नऊवारी साडी नेसण्याची जी प्रचलित पद्धत होती तशाच साड्या नेसलेल्या रिद्धी आणि सिद्धी रविवर्मा यानं या चित्रात दाखवल्या. याचा परिणाम खूप छान झाला. सर्वसामान्य जनतेला हा देव आपला आहे असं जाणवायला लागलं आणि चित्रकार राजा रविवर्मा याच्या नावाला लोकप्रियतेचं भलंमोठं वलय लाभलं.
————————————————————————–