लेखक : श्रीराम खाडिलकर
देशातली सर्वाधिक उंच गणेश प्रतिमा
महाराष्ट्रात गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जायला लागला त्यामागचा त्या काळातला मुख्य उद्देश एकच होता आणि तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात सगळ्या भारतीयांनी एकत्र व्हायचं. या उत्सवाच्या निमित्तानं तसं घडलं खरं. स्वातंत्र्य मिळाल्यावर बऱ्याच ठिकाणी उद्देश दूर राहिला आणि आपल्या गणेश प्रतिमेची उंची जास्तीत जास्त वाढवण्यावर काही ठिकाणी असलेल्या गणेश भक्तांनी भर दिला.
गणपती पाहण्यासाठी खरंतर पुणे आणि मुंबई या शहरांचा लौकिक जगभर आहे. उंच गणपती मुंबईत आणि विसर्जन मिरवणूक पुण्यात पाहायची असं ठरवून जगभरातले पर्यटक भारतात येतात. मात्र सर्वाधिक उंचीचा गणपती म्हणून महाराष्ट्राची ओळख नसून हैदराबाद मधल्या खैराताबाद या ठिकाणी असलेल्या गणपतीचा उल्लेख आपल्या देशातील सर्वाधिक उंचीची गणेश प्रतिमा म्हणून केला जातो.
याचं विशेष असं की याचं आणि लाडूचं अतूट नातं आहे. ते एकेकाळी यांचं आकर्षणही होतं. या गणेश प्रतिमेचं विसर्जन तिथं जवळच असलेल्या हुसैन सागर नावाच्या भल्यामोठ्या तलावामध्ये क्रेनची मदत घेऊन केलं जातं. या गणेश प्रतिमेची उंची ६१ फूट नोंदली गेली. ती सुद्धा एक गमतीशीर गोष्ट आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक कार्यकर्ते असलेल्या शंकरय्या यांनी लोकमान्य टिळक यांच्या आवाहनापासून प्रेरणा घेतली आणि १९५४ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा
म्हणजे पहिल्या वर्षी एक फूट उंचीचा गणपती बसवला. आणि त्या नंतर दरवर्षी एक फूट अधिक उंच गणपती बसवला जाऊ लागला. २०१४ पर्यंत असंच सुरू होतं. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली त्यामुळे गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन घालावी लागली. या खैराताबादच्या गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आली. कारण, न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं सगळ्यांनाच बंधनकारक असतं. गणपती बाप्पाची प्रतिमा देवाची असल्यानं त्याचं पावित्र्यही टिकवून ठेवणं गरजेचं असतं. त्याकडे दुर्लक्ष होऊन चालत नाही. कारण सर्वसामान्यांच्या भावना त्या प्रतिमेशी निगडित असतात. त्यानंतर २०१९मध्ये ६१फूट उंच गणपतीची प्रतिमा तयार केली गेली. त्यावर्षी ती गणेश प्रतिमेच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपये खर्च झाले असं सांगितलं जातं. विसर्जनाच्या दिवशी गावातल्या महत्वाच्या रस्त्यांवरुन भव्य मिरवणूक काढली जाते.
खैराताबाद येथे गेल्या वर्षीपेक्षा १३ फूट अधिक उंचीची म्हणजे ६३ फूट उंचीची इकोफ्रेंडली गणेश प्रतिमा यंदा स्थापित केली आहे. तब्बल १५० कारागीर या प्रतिमेला आकार देण्याचं काम करत होते. यंदा प्रथमच शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणपतीची प्रतिमा स्थापित केली आहे. दहा हात असलेल्या म्हणजे दशभुजा उभ्या या गणेशाच्या शिरावर छत्र म्हणून नागानं त्याचा फणा धरला आहे असं त्याचं यंदाचं रुप आहे. गणरायाच्या डाव्या हाताच्या दिशेला विद्येची देवता सरस्वती असून उजव्या हाताच्या दिशेला लक्ष्मी आसनस्थ झाल्याचं दिसतं. या गणरायाच्या दर्शनाचा चाळीस लाख भाविकांच्या विक्रम यंदा मोडला जाईल असं बोललं जातंय.
———————————————————————
छायाचित्र सौजन्य : – खैराताबाद गणेश_ऑफिशिअल वरुन साभार.