लेखक श्रीराम खाडिलकर :
लघुचित्रातला लोभसवाणा श्रीगणेश
गणपतीची रूपं अगणित आहेत. आज या ठिकाणी गणपतीचे रूप पाहायला मिळत आहे ते लघुचित्र आहे. सतराव्या शतकामध्ये नैसर्गिक रंग वापरून कागदावर काढलेलं हे चित्र आज इतक्या वर्षानंतर सुद्धा अत्यंत तजेलदार रंग वापरून नुकतंच हे चित्र पूर्ण केलं आहे असा भास होतो.
या चित्रात आपल्याला बघायला मिळतो तो लड्डू गणेश. हातामध्ये लाडू घेतलेल्या गणपतीचं असं रुप आज आपल्याकडे क्वचितच दिसतं. आज मोदक आवडतात म्हणून त्यांच्या हातात मोदक दाखवला जातो. त्या काळात गणपतीला लाडू आवडतो अशी श्रद्धा होती. म्हणून गणपतीच्या हातामध्ये मोदकाच्या ऐवजी या लघुचित्रात लाडू दाखवला आहे. हे लघुचित्र आज नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात असून साभार येथे त्याची प्रतिमा दिली आहे. राष्ट्रीय मौल्यवान संपत्तीपैकी हे एक महत्त्वाचे लघुचित्र आहे.
हे चित्र पहाडी शैलीतल्या खास करून ज्याला बसोली कलम म्हणतात त्या बसोली कलम मधलं हे चित्र आहे.
कलम याचा अर्थ बसोली या गावांमध्ये त्या काळामध्ये ज्या शैलीत चित्र काढली जात होती त्या शैलीत काढलेलं हे चित्र असं समजतात. बसोली कलमचे सगळे विशेष तपशील या गणपतीच्या लघुचित्रामध्ये आपल्याला दिसतात.
मूळची बसोली शैली ही अभिव्यक्तीच्या दृष्टीनं रांगडेपणा असलेली आहे. भाववाही प्रभावी, जोरकस रेषा असल्यामुळेच लोककलेच्या चित्रण तंत्राशी बरीच मिळतीजुळती आहे. थोडक्यात हा लघुचित्रप्रकार अत्यंत समृद्ध चित्रकला म्हणावा असाच आहे. या चित्रात गडद रंगछटांचा छान आणि प्रभावी उपयोग केलेला दिसतो. रचनेच्या दृष्टीने विचार केला तर नजर खिळून राहावी अशी रचना यात दिसते… अनेक वैशिष्ट्ये एकत्र झालेली ही शैली असल्यानं मनाचा ठाव घेणारी चित्र यात काढली जातात.
सोबतचं चित्र बसोली शैलीचं प्रसिद्ध चित्र आहे. सुपासारखे कान, गळ्यात सर्प, कपाळावर काढलेल्या गंधांच्या रेघांवर ठळक चंद्रकोर दिसत असून कमळाच्या आसनावर विराजमान झालेले गणराय दिसत आहेत. कंबरेला पीतांबर, त्याच्या सोग्याच्या निऱ्या, रक्तवर्ण असलेली अंगकांती
लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर रंग छटेची आहे. एका हातात कमळ तसंच मुकुटाच्या टोकांवरही कमळं दाखवली आहेत. दुसऱ्या हातात कुर् हाड तिसऱ्या हातात लाडू आणि चवथ्या हातात जपमाळ असं हे अनोखं रुप दिसतं. विशेष म्हणजे त्याच्या सोंडेत लाडू आहे म्हणजे गतिमानतेचंही दर्शन यामुळे घडतं. एका महिरपीखाली ही गणरायाची प्रतिमा लक्ष वेधून घेते.
———————————————————————