लेखक : श्रीराम खाडिलकर
भगवान आणि गणराय.
आज गणेश चतुर्थी. घराघरांमध्ये गणरायाचं आगमन झालं असेल. या गणरायाचं विशेष म्हणजे तो विद्या आणि कलांचा देव आहे आणि त्याचं स्मरण, त्याची आराधना आणि सोबतच सातत्यानं अध्ययन जो करतो त्याला हा गणराय भरभरून देत असतो.
माझ्यासमोर घडलेली एक गोष्ट याच संदर्भातली आहे. माझा एक मित्र आहे त्याचं नाव आहे भगवान रामपुरे. तो राहतो सोलापुरात. मुंबईमध्ये राहून मेहनत करून नाव कमवायचं आणि आयुष्यभर छान जगायचं हे स्वप्न प्रत्येक जण पाहतो तसं त्यानंही पाहिलं होतं. १९९३ सालची गोष्ट असावी. गोरेगाव भागातल्या बैठ्या चाळवजा एका छोट्या जागेमध्ये या भगवाननं एक स्टुडिओ सुरू केला. स्टुडिओ म्हणजे शिल्पकलेचा स्टुडिओ. तिथं बसून त्यानं शिल्प निर्माण करायची असं ठरलं. ज्या दिवशी स्टुडिओ सुरू करायचा त्या दिवशी त्याच्याकडच्या कारागिरांनी त्याला सांगितलं की आपण आधी पूजा करू या. पूजा करायची पण कशाची? म्हणून स्वतःनंच हातात माती घेतली तेव्हा अचानक तो ट्रान्समध्ये गेलाय असं कारागिरांना लक्षात आलं. हातात माती आल्यावर त्याचे डोळे बंद झाले आणि कळत नकळत मातीत आकार तयार होत गेला… त्यानं
डोळे उघडल्यावर ते गणपतीचं छानसं रुप तयार झाल्याचं दिसलं. अशा गणपतीचं पूजन करून त्याचा स्टुडिओ सुरू झाला. त्या गणपतीवर मोल्ड टाकून आपल्या स्टुडिओत येणाऱ्या आणि आपल्याहवर प्रेम करणाऱ्यांना हा गणपती भेट म्हणून द्यायचा असं त्यांनी ठरवलं. सुमारे चार इंचाच्या आकाराचा फायबरमधला हा गणपती तो भेट द्यायला लागला. (या भगवानंच मला बऱ्याच वर्षांपूर्वी दिलेली गणरायाची प्रतिमा या मजकुरासोबत आहे.)
ज्यांनी ज्यांनी हा गणपती पाहिला त्या प्रत्येकाला तो विलक्षण आवडला. जवळपास प्रत्येकानंच तसा गणपती हवा असा त्याच्याकडे आग्रह धरला. भगवानकडून श्रद्धा म्हणून दिला जाणारा गणपती त्याच्याच चाहत्यांनी विकत घेण्याची तयारी केली आणि त्याच्या स्टुडिओतून इतर कामांच्या पेक्षा अधिक वेगाने शेकड्याने म्हटलं तरी चालेल या गणपतीच्या प्रतिमा लोक मोठ्या श्रद्धेनं विकत घ्यायला लागले. पाहता पाहता भगवानचा हा गणराय देशविदेशात पोहोचला. थोडक्यात, अपेक्षा आणि कल्पना नसताना याच गणरायाच्या प्रतिमेनं त्याला चक्क मालामाल केलं. इतकं की वर्षभरात त्यानं स्वतःचं घर आणि स्टुडिओ अशा दोनही गोष्टी उभ्या केल्या. हे त्यांच्या अविरत मेहनतीचं आणि गणरायावरील श्रद्धेचा फळ आहे.
या शिल्पकार भगवाननं कवी गुलजार, विजय तेंडुलकर अशा अनेक नामांकितांची व्यक्तिशिल्पं घडवली आहेत. आज हा भगवान एक महान शिल्पकार म्हणून ओळखला जातो त्यानंच घडवलेलं 108 फूट उंचीचं श्रीमद् शंकराचार्य यांचं शिल्प येत्या २१ तारखेला सगळ्यांसाठी खुलं होतंय. मुंबईच्या शेअर बाजारच्या बलवंत बैलाची प्रतिमासुद्धा याच भगवाननं घडवली आहे.
भगवानची प्रगती गेल्या काही वर्षात दृष्ट लागावी अशी झाली आहे आजही अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा जातो त्यावेळी अनेक मोटारीमध्ये स्टिअरिंग व्हीलच्या समोर डेकवर भगवाननं केलेल्याच गणपतीची प्रतिमा दिसत असते. हे सगळं गणरायावर असलेल्या श्रद्धेचा फळ आहे असं त्याला वाटतं.
——————————————————————–
आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाच्या संदर्भातलंच काही रोचक घटना आपल्याला वाचायला मिळणार आहेत.