“आम्ही तब्बल ३६ वर्षानंतर एकत्र येत आहोत तेही रोमांटिक भूमिकेत म्हणतोय…..प्रशांत दामले
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सकाळी उठल्यापासून प्लस-मायनस काहीतरी घडलं असतं माझी नाटक कौटुंबिक जिव्हाळ्याची असतात आपल्या समोरचा प्रेक्षक हा ८ ते ८० वयोगटातील आहे हे लक्षात घेऊन माझं नाटक लिहिल जातं व सादरही केली जाते. माझ नाटक बघताना प्रेक्षकांना लाज वाटत आहे असे काही होत नाही. या नाटकाचा विषय आई – वडील आणि मुलगी यांचं नातं कसं असतं आणि त्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा कसा असतो याच्यातील फरक आपल्याला बघावयास मिळेल जसजशी पिढी वाढत जाते तसतसा बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातो एक स्त्री, आई यांचं यात किती महत्त्व आहे हे अधोरेखित केले आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे आपल्या येऊ घातलेल्या ‘सारखं काहीतरी होतय’ या नाटकाविषयी ‘मुंबई न्यूज’ शी बोलत होते
“प्रशांतला मी जेव्हा भेटली तेव्हा तो फक्त नट होता, एक गायक होता पण आज तो एक परिपूर्ण अशी संस्था झालेला आहे. त्याच्याकडे लोक आदराने बघतात. आज तो रंगमंचावरील अनभिषिक्त सम्राट झालेला आहे आणि त्याच्याबरोबर मी तब्बल ३६ वर्षानंतर जीवनाच्या या वळणावर पुन्हा या नाटकाद्वारे एकत्र येत आहोत आणि मुख्य म्हणजे रोमांटिक भूमिकेतून येत आहोत याबद्दल मी खूपच उत्साही आहे व याचा मला अभिमान आहे.” ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर या आपला अनुभव सांगत होत्या.
या नाटकात प्रशांत ची मुलगी झालेली सिद्धी घैसास म्हणते हे माझे व्यावसायिक पहिलेच नाटक दोन लेजंड व संकर्षण दादा या सगळ्यांन मुळे मी काम करू शकते आहे. अजूनही खूप मेहनत बाकी आहे. मला प्रथम या नाटकात काम करण्यासाठी विचारले गेल्यावर दडपण तसेच आनंद या दोन्ही संमिश्र प्रतिक्रिया माझ्या मनात आल्या.
या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक संकर्षण कऱ्हाडे म्हणाले “या नाटकाचा विषय खूपच हलकाफुलका आहे. एका अत्यंत घाबरट अशा बापाची ही कथा आहे. आपली मुलं घरा बाहेर गेल्यानंतर त्यांना यावयास उशीर झाला वर त्यांना फोन केल्यास त्यांच्या कडून मिळणारी उत्तर, यामुळे बाबाच्या मनावर तो दाखवत नसला तरीही होणारा परिणाम, काळजी, भीती, या सर्वांचा परिणाम काय होतो हे दाखवणार हे नाटक आहे. आणि हे सगळं करत असताना बाप आणि मुलीच्या पिढीमधील दुवा साधणारी त्यांच्यातील कम्युनिकेशन स्मूथ करणारी, घर बांधून ठेवणारा फॅक्टर म्हणजे गृहिणी, आई. अशा तीन पिढ्या प्रतिबिंबित करणार असं हे नाटक आहे.
यात एक छोटीशी लव्ह स्टोरी सुद्धा आहे कारण कितीही अनुभव वाढला, कितीही वय वाढलं, तरी हे दोघं एकत्र आल्यावर लव्ह स्टोरी होणार नाही असं होऊच शकत नाही. त्यातही हे दोघेही गातात छान, वर्षानुवर्षे तितकेच सुंदर दिसतात आणि या गोष्टीचा एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मी फायदा उचलला नसता तर हे माझे अपयशच असते.
तर केशव करमरकर या माणसाच्या आयुष्यात सारख काही ना काहीतरी होतंय म्हणजेच हे नाटक होय.”