‘निम्मा शिम्मा राक्षस’…. धमाल करमणूक

लहान मुलांचे नाटक म्हटलं कि त्यामध्ये त्यांच्यासाठी मनोरंजन हे येणारच, त्यांना काय आवडत, त्यांची आवड कश्यात आहे, असे सारे अनेक प्रश्न घेऊन नाटके सादर केली जातात. मुलांना करमणूक बरोबर प्रबोधन करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. एखादा सुविचार नाट्यकलेमधून देता येतो. अद्वैत थीएटर्स निर्मित राहुल भंडारे यांनी बुक माय शो यांच्याबरोबर संयुक्तपणे निम्मा शिम्मा राक्षस ची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांचे असून या नाटकातील गीते आणि दिग्दर्शन  चिन्मय मांडलेकर यांनी केल आहे. प्रकाशयोजना आनंद केकान, नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत मयुरेश माडगावकर यांनी केले आहे. यामध्ये मयुरेश पेम, अंकुर वाढवे, विकास चव्हाण, नितीन जंगम, अभिजित भोसले, अमृता कुलकर्णी, गायत्री दातार असे कलाकार आहेत. सर्वांनीच आपापल्या लहान/ मोठ्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.

‘निम्मा शिम्मा राक्षस ‘ ची कथा अर्थात राक्षसाची आहे व त्याचबरोबर अब्दुल्ला हा मासेमारी करणारा मुलगा आणि गायत्री दातार हिने राजकन्येची भूमिका केली आहे. आणि राक्षस झालेला अंकुर वाढवे यानी पण धमाल आणली आहे. हि कथा- अब्दुल्ला-राक्षस- राजकन्या यांच्याभोवती फिरत असली तरीही त्याला उठाव देण्यासाठी हसन/ हसीना/ सुलतान/ आणि इतर व्यक्तिरेखा सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. ‘निम्मा शिम्मा राक्षस ‘ हे वेगळ्या पठडीतले  नाटक असून हे नाटक रत्नाकर मतकरी यांनी साधारण पन्नास वर्षापूर्वी लिहिलेले हे नाटक आहे. त्याकाळी सुद्धा ह्याचे प्रयोग खूप गाजले होते. त्यावेळी मुलांची मानसिकता वेगळी होती. आणि आजची मुले त्यामानाने स्मार्ट झालेली आहेत. त्यांच्या करमणुकीची कल्पना वेगळ्या आहेत. त्यांच्यासमोर मनोरंजन करण्यासाठी दूरदर्शन, फेसबुक, इत्यादी माध्यमे आहेत. त्याचबरोबर पाश्चात्य करमणुकीचा पगडा सुद्धा त्यांच्या मनावर झालेला आहे हे आपणास विसरून चालणार नाही. ह्या सर्वांची माहिती आजचे नव्या दमाचे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांना आहे. आणि त्यामुळे ह्या सर्वांवर मात करून आजच्या मुलांना रंगमंचावर विविध आकर्षक प्रयोग करून आजच्या मुलांना नाट्यगृहाकडे वळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.त्याचबरोबर निर्माते राहुल भंडारे आणि नाटकामधील कलाकार यांचा वाटा सुद्धा खूप मोठा आहे. आजच्या काळात हे नाटक काहीसा बदल करून सादर केले आहे.

      अब्दुल्ला नावाचा मुलगा- मासेमारी करताना त्याच्या गळाला एक बाटली लागते. लहान बाटली असली तरी ती खूप जड असते. मोठ्या कष्टाने अब्दुल्ला ती बाटली उघडतो. आणि एक चमत्कार घडतो. त्या बाटलीतून एक लहानसा राक्षस बाहेर पडतो. राक्षसाला पाहून अब्दुल्ला घाबरतो. पण पुढे त्याची दोस्ती त्याच्यासोबत होते. तुला काय हवे ते माग असे राक्षस अब्दुल्लाला सांगतो. तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करीन असे म्हटल्यावर अब्दुल्ला सुरवातीला एक लाडू खायला मागतो. राक्षस त्याला लाडू देतो पण तो अर्धाच असतो. कारण राक्षस हा निम्मा शिम्मा असतो. त्याला पूर्ण काही देता येत नाही. जे मागायचे ते दुप्पट मागायचे असे करताना अब्दुल्ला राजकन्येबरोबर माझे लग्न व्हावे अशी इच्छा बोलून दाखवतो. आणि मग खऱ्या धमाल नाट्याला सुरवात होते. शेवटी काय होते हे तुम्ही नाटक बघून जाणून घ्या.

       मयुरेश पेम यानी अब्दुल्लाची भूमिका प्रचंड उत्साहाने आणि संपूर्ण उर्जेने सादर केली असून त्यामध्ये नृत्ये, विनोद, देहबोली चा सुरेख वापर केला आहे. गायत्री दातार हिने साकारलेली राजकन्या लक्षात राहते. निम्मा शिम्मा राक्षस ची भूमिका अंकुर वाढवे ने दमदारपणे केली असून त्याला कोणीच विसरू शकणार नाही. अब्दुल्ला आणि राक्षस यांचे प्रसंग रंगमंचावर धमाल उडवतात. ह्याशिवाय नितीन जंगम चा हसन, अमृता कुलकर्णी ने केलेली हसीना, अभिजित भोसले यांचा सुलतान तसेच शर्मिष्ठा  पवार यांनी केलेली अब्दुल्लाच्या आईची भूमिका तसेच विकास चव्हाण यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा छानपणे रंगवल्या आहेत.

     संदेश बेंद्रे यांनी उभारलेले रंगमंचावरचे आकर्षक असे नेपथ्य हे प्रेक्षकांची मने जिंकून घेतो. नेपथ्य आणि प्रकाशयोजना आणि सोबत केलेला प्रोजेक्शनचा वापर ही या नाटकाची बलस्थाने आहेत. एक छान बालनाट्य बघितल्याचे समाधान या नाटकातून तुम्हाला मिळेल.

दीनानाथ घारपुरे………..

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns