दीपकचे ‘ये जवळ ये लाजू नको’

सचिन चिटणीस…….

नवीन वर्षाच्या स्वागताला कोकणात गेलेले १० – १५ मित्र जानेवारीचा मध्यान्ह उजाडला तरी आले नाहीत म्हणून मित्रवर्य अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता दीपक कदमला फोन लावला तर या पठ्ठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावी त्याच्या घरात नाटक मंडळी सुरू केल्याचे कळले, म्हणून त्याला विचारले “अरे बाबा हे नाटक मंडळी म्हणजे काय प्रकरण आहे?”
तेव्हा दिपक म्हणाला “अरे काही नाही नाटक बसतोय त्याचे नाव आहे ‘ये जवळ ये लाजू नको’ लेखन – संवाद, दिग्दर्शन संजय कसबेकरचे आहे. बऱ्याच वर्षांनी माझ्यात अभिनय करायचा किडा वळवळल्याने दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतःकडे ठेवलेली नाही.”
“आम्ही एकूण १४ जणांची टिम आहे. अगदी फुल्ल टू धमाल करत सकाळी पहिल्या अंकाची तालीम तर संध्याकाळी दोन्ही अंकाची तालीम करतोय आणि धमाल म्हणजे आम्ही ३ – ३ चा गट बनवला आहे पहिली तालीम झाली की हे सर्व गट कामाला लागतात कोण भाजी चिरत, कोण चपात्या बनवते कोण डाळ तर कोण भांडी घासते अरे जाम मज्या येते, पूर्वीची नाटक मंडळी अशीच करायची त्याचेच मी अनुकरण करत आहे. जेवण झाल्यावर दुपारची वामकुक्षी पुन्हा संध्याकाळी तालीम. हा हा म्हणता नाटक बसलंय बघ, नाहीतर मुंबईत तालीम म्हणजे कोण बदलापुरातुन येतोय कोण गोरेगाव.


“नक्की असे नाटकात काय आहे?”
“तसे बघायला गेल्यास हा एक कॉस्च्युम ड्रामाच आहे. याचा फॉर्म जरी लोकनाट्याचा असला तरी पूर्णपणे हे लोकनाट्य नसून, फार्सीकल नाटक आहे. राजा, प्रधान, शिपाई असाच फॉर्म असला, तरी यात लावण्य आणि गाणीही आहेत. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारं हे नाटक आहे. दादा कोंडके ज्याप्रकारे वर्तमान काळातील घाडामोडींवर भाष्य करणाऱ्या कलाकृती बनवायचे तसा प्रयत्न आम्ही ‘ये जवळ ये लाजू नको’ या नाटकात केला आहे. कॉमेडी अंगानं एक विचार मांडत रसिकांचं मनोरंजन करण्याचा हेतू आहे.”

“यात मी प्रधान साकारत आहे. हा प्रधान थोडा करप्ट आहे. संपूर्ण व्यवस्था तो राबवतोय. राजापर्यंत तो कोणतीच गोष्ट पोहोचू देत नाही. हे खरं तर आजच्या काळातील बऱ्याच व्यक्तिरेखांचं प्रतिनिधीत्व करणारं आहे. राजाच्या आजूबाजूला असणारी मंडळी सर्वसामान्यांना राजापर्यंत पोहोचू देत नाहीत. यातील नायक राजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. प्रधानची खेळी राजाला कळते आणि अखेरीस नायकच राज्याचा प्रधान बनतो असं विनोदी अंगानं दाखवण्यात आलं आहे.”

“राजे- रजवाड्यांच्या काळात जे प्रॉब्लेम्स होते, ते आजही कायम आहेत. तेव्हा स्वयंघोषित राजे होते, आता आपण निवडून दिलेले आहेत. निवडून
सत्तेत गेल्यावर कोणीही जनतेचा विचार करत नाही हेच कटू सत्य ‘ये जवळ ये लाजू नको’ या नाटकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

“यात माझ्या सोबत शिवाजी रेडेकर, संजय कसबेकर, कमलेश सुर्वे, शिल्पा सावंत, राजू मोरे, अनिकेत बंदरकर, सिद्धेश परब, सिद्धांत जाधव, रेश्मा दीपक, भाग्यश्री उतेकर, सुनैना आदी कलाकार या नाटकात काम करत आहेत. दादा परसनाईक म्युझिक करत आहेत. कॉस्च्युम प्रिया भिडेंचं आहे. प्रकाशयोजना महेंद्र भांबीडनं केली आहे.”

“माऊली निर्मित अंतर्गत मी ‘साई माऊली’ हे महानाट्य रसिकांच्या भेटीला आणलं होतं. आता याच बॅनरखाली ‘ये जवळ ये लाजू नको’ हे नाटक घेऊन येत आहे. लोकनाट्याचा बाज असलेलं हे फार्सीकल नाटक आहे. डीके फॅक्टरीची प्रस्तुती या नाटकाला लाभली आहे.”

“१५ जानेवारीपर्यंत आम्ही कोकणातच तळ ठोकणार आहोत. त्यानंतर मुंबईला येणार आणि तिथं चार-पाच दिवस रिहर्सल करून २६ जानेवारीपासून प्रयोग सुरू करणार. कोरोनाच्या परिस्थितीवर पुढील सर्व गणितं अवलंबून असतील. आता आमची कॉस्च्युमपासून इतर सर्व गोष्टींची तयारी पूर्ण झाली आहे. ऑनलाईन प्रयोगही करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजी समजून घेत आहोत पण वातावरण थोडं दूषित असल्यानं थांबलो आहोत. मुंबईत ५० टक्के तरी परवानगी असली तरी इतर जिल्हांमध्ये केवळ ५० माणसांची परवानगी आहे. इतक्या कमी प्रेक्षकांमध्ये प्रयोग करणं शक्य नाही.”

“मात्र आमची मेहनत वाया जाणार नाही याचा मला विश्वास वाटतो, तर लवकरच भेटुयात” म्हणत दिपकने निरोप घेतला.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns