“ज्याच्यात हा चित्रपट पचवायची ताकद असेल त्यांनीच तो पहावा, इतरांनी त्याच्या वाटेस जाऊ नये” १४ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या आपल्या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर बोलत होते, ते पुढे म्हणाले हा चित्रपट तुम्हाला सुन्न करून सोडेल, याचा शेवट तर मला आजही हादरवून सोडतो.
हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकाला पचवणे सोपे नाही. हा चित्रपट जसा करायला सोपा नव्हता तसाच तो बघावयासही सोपा नाही. प्रेक्षकांना छान छान , गुडी गुडी बघावायचे असेल तर तो हा सिनेमा नाही हे मी पहिलेच सांगून टाकतो. मात्र दर्दी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्कीच बघावा असेही मी सांगेन.
एका खोली मुळे घडलेले हे नाट्य आहे त्या खोलीमध्ये काय काय होऊ शकेल ते या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना दिसेल यात गिरण्या बंद झाल्या नंतर जे गिरणी कामगार आज कुठेतरी शुल्लक नोकर्या करताना दिसत आहेत, थोडक्यात आयुष्याला कंटाळलेली अशी जी लोक आहेत त्यांची ही कथा आहे.
मुंबईचे शांघाय करायच्या नादात गिरण्या मात्र उद्ध्वस्त झाल्या आणि लालबाग-परळचा भाग सोडल्यास बाकी इतर कोठेही काहीही झाले नाही. या चित्रपटात प्रत्येक जण आपला एक वाटा शोधत असतो आणि तो वाटा मिळविण्यासाठी मग तो कोणत्याही थराला जातो.
जयंत पवारच्या लेखणीतून उतरलेली ही कथा मला खूप डिस्टर्ब करून गेली आणि म्हणूनच यावर चित्रपट बनवावा अशी माझी इच्छा झाली. मात्र हा चित्रपट बघावयास जयंत आज नाही याची खंत आहे.