सुडाची कथा ‘दशमी’
सचिन चिटणीस
या चित्रपटाला मिळत आहेत 3 स्टार
’दशमी’ हा एक रहस्यमय खुनाचा (मर्डर मिस्ट्री) चित्रपट आहे. पुणे शहरात लागोपाठ झालेल्या तीन खुनांमुळे खळबळ उडते. पॅथॉलॉजी लॅबचे मालक दिनेश मेहता (शाम मशालकर) यांच्या तिसऱ्या खुनानंतर, पोलीस निरीक्षक आसिफ मुजावर (रवी प्रकाश) यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला जातो. तपासादरम्यान मुजावर लक्ष्मी देसाई (गौरी इंगवले) बलात्कार प्रकरणाची फाईल पुन्हा उघडतात. या बलात्कार प्रकरणात संशयाची सुई आधीच तुरुंगात असलेला लक्ष्मीचा प्रियकर वासू आणि आमदार आनंद म्हात्रे (महेश मांजरेकर) यांचा मुलगा बंटी (योगेश भोसले) यांच्याकडे वळते. तपास सुरू असतानाच रिक्षाचालक मल्हार (विजय निकम) आणि बंटी या दोघांचेही मृतदेह सापडतात.
‘दशमी’चा हेतू प्रामाणिक आहे आणि विजयदशमीच्या प्रतीकात्मकतेशी जोडलेला न्यायाचा संघर्ष चांगला मांडला आहे. परंतु, काही तांत्रिक उणिवा आणि ठराविक सीन्सचा संथ वेग चित्रपटाला अधिक धारदार होण्यापासून रोखतो. मकरंद अनासपुरे यांना नेहमीच्या विनोदी छटा सोडून एका गंभीर व संवेदनशील भूमिकेत पाहणे हा चित्रपटाचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू ठरतो. लक्ष्मी देसाईच्या भूमिकेत कलाकार गौरी इंगवले हिने चांगले काम केले आहे. पोलीस निरीक्षक आसिफ मुजावरच्या भूमिकेत कलाकार रवी प्रकाश ठीक. रिक्षाचालक मल्हारच्या भूमिकेत विजय निकम छाप पाडून जातात, तर आमदार म्हात्रे यांच्या भूमिकेत महेश मांजरेकर स्वतःचा प्रभाव टिकवून ठेवतात.
निलंबित पोलीस निरीक्षक जवळकर यांच्या भूमिकेत देवेंद्र गायकवाड यांचे काम मध्यम स्वरूपाचे आहे. लक्ष्मीचा प्रियकर वासूच्या भूमिकेत राज कुंदन यांचे काम साधारण आहे. बंटी म्हात्रेच्या भूमिकेत योगेश भोसले जेमतेम प्रभाव पाडतात. पोलीस आयुक्त सुधांशू रॉय यांच्या भूमिकेत प्रसन्न केतकर आणि लॅब मालक दिनेश मेहतांच्या भूमिकेत शाम मशालकर यांची कामगिरी बरी आहे. संदेश जाधव, शिवराज वाळवेकर, शीतल अहिरराव, प्रेम नरसळे, प्रसाद खैरे आणि विवेक यादव यांनी आपापल्या भूमिकांना साजेसे काम केले आहे.
सुरेश पंडित यांची कथा फारशी प्रभावी वाटत नाही आणि त्यात नाविन्याचाही अभाव जाणवतो. बलात्कार आणि त्यावरील सूड या धाटणीच्या कथा यापूर्वी प्रेक्षकांनी कित्येकदा पाहिल्या आहेत. सुरेश पंडित यांनी लिहिलेली पटकथाही चाकोरीबद्ध आहे; अगदी शेवटच्या टप्प्यातील रहस्याचा उलगडाही प्रेक्षकांमध्ये कोणतीही उत्सुकता निर्माण करत नाही. सुरेश पंडित, हृषीकेश गुप्ते आणि अमित बेंद्रे यांचे संवाद केवळ ठीकठाक आहेत.
योगेश भोसले यांचे दिग्दर्शन सरासरी पातळीवरचे आहे. सुरेश पंडित यांचे संगीत केवळ कथेपुरते उपयोगी ठरते. वैभव देशमुख आणि सुरेश पंडित यांचे गीतलेखन साधारण आहे. सुजीत कुमार आणि फुलवा खामकर यांचे नृत्यदिग्दर्शन ठीकठाक आहे. रवी लोहार यांचे पार्श्वसंगीत आणि विकास सिंग यांचे छायांकन (कॅमेरा) बरे जमले आहे. अजय आणि कार्तिक डांगरी यांनी बसवलेले साहसदृश्य (अॅक्शन सीन्स) फारसे थरारक वाटत नाहीत. आनंद साठे यांचे कला दिग्दर्शन साधारण असून, विनय शिंदे यांचे संकलन (एडिटिंग) अधिक चुस्त असण्याची गरज होती.
एकूणच हा चित्रपट सर्व साधारण कॅटेगरीत मोडतो.
































