आई हरवली तर… तुम्ही काय कराल? ‘धाराऊ’च्या ट्रेलरमधून उलगडणार एका लहान मुलाची आणि गोमातेच्या नात्याची काळजाला भिडणारी कहाणी!

*आई हरवली तर… तुम्ही काय कराल? ‘धाराऊ’च्या ट्रेलरमधून उलगडणार एका लहान मुलाची आणि गोमातेच्या नात्याची काळजाला भिडणारी कहाणी!*

*‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ — मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत*

मुंबई : आई म्हणजे माया, ममता आणि लेकरासाठी संपूर्ण जग! पण ज्या लेकरासाठी आईचं अस्तित्व हेच त्याचं विश्व असतं, त्याच लेकराला आई हरवल्याची जाणीव झाली तर? आपल्या आईचा शोध घेण्यासाठी होणारी त्याची धडपड, मनातील भावनांचा कल्लोळ आणि एका मुक्या जीवाशी निर्माण झालेलं मायेचं अतूट नातं यांची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन आगामी मराठी चित्रपट ‘धाराऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून एका लहान मुलाच्या निरागस भावविश्वाची आणि गोमातेबद्दलच्या त्याच्या जिव्हाळ्याची झलक पाहायला मिळते. आईच्या मायेची आस आणि एका मुक्या जीवामध्ये आईचं प्रेम शोधणारं बालमन या भावनांमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारतीय संस्कृतीत गोमातेला असलेलं श्रद्धेचं स्थान आणि माणूस व प्राणी यांच्यात निर्माण होणारं निस्वार्थ प्रेम यांचा भावनिक वेध ‘धाराऊ’मधून घेण्यात आला आहे. एका लहान मुलाच्या नजरेतून उलगडणारं हे नातं मायेची व्याख्या केवळ रक्ताच्या नात्यांपुरती मर्यादित नसल्याची जाणीव करून देतं. आईच्या प्रेमाची उब अनुभवलेल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा हा विषय प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवण्याची क्षमता बाळगतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना मनात निर्माण होणारा “आई हरवली तर तुम्ही काय कराल?” हा प्रश्न या कथेतील भावनिक गुंतवणूक अधोरेखित करतो.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष सुरेश शिंदे यांनी केलं आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून भावनिक आशय आणि सांस्कृतिक संदर्भ असलेला विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी केली आहे. कार्यकारी निर्माते अभिषेक शिंदे, मयुर परमार असून एडिटर मंगेश शेळके हे आहेत. वेगळा विषय, भावस्पर्शी नातं आणि गोमातेविषयीची श्रद्धा यांची सांगड घालणारा ‘धाराऊ’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक हळवा अनुभव घेऊन येणार आहे.

‘धाराऊ’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. एका लेकराची आईसाठीची ओढ, गोमातेबद्दलचं प्रेम आणि मायेच्या नात्याची हळवी अनुभूती मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ या भावस्पर्शी टॅगलाइनमधून व्यक्त होणारं नातं प्रेक्षकांच्या मनाला किती भिडणार, याची उत्सुकता आहे.

*Trailer Link* – https://youtu.be/CbkyHj21dzg

IPRoyal Pawns