अपोलो हॉस्पिटल्सच्या ‘माय हँड्स आर रेडी’ मोहिमेने ३० दिवसांत ६१,२२१ सीपीआर (CPR) संकल्पांसह रचला जागतिक विक्रम

अपोलो हॉस्पिटल्सच्या ‘माय हँड्स आर रेडी’ मोहिमेने ३० दिवसांत ६१,२२१ सीपीआर (CPR) संकल्पांसह रचला जागतिक विक्रम

‘युनायटेड फॉर एव्हरी हार्टबीट’ या संकल्पनेवर आधारित जागतिक हृदय दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेने १२० हून अधिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचून सीपीआरविषयी जनजागृती आणि आपत्कालीन सज्जतेला प्रोत्साहन दिले.

मुंबई, २८ सप्टेंबर २०२६: ‘नवी मुंबई एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी सज्ज आहे का?’ या एका प्रश्नातून अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने सीपीआर संकल्पाची ही चळवळ सुरू केली.

८ जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान राबवलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट ५०,००० लोकांना सीपीआर शिकण्याचा संकल्प करण्यास प्रवृत्त करणे हे होते; जेणेकरून वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच्या अत्यंत नाजूक क्षणांमध्ये ते योग्य पाऊल उचलू शकतील. नवी मुंबईकरांनी केवळ हे उद्दिष्टच पार केले नाही, तर संपूर्ण शहराने एकत्र येत ही एक लोकचळवळ बनवली.

शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि सामाजिक संस्था अशा १२० हून अधिक संस्थांनी यात सहभाग घेतला. यात विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, नोकरदार, कुटुंबे आणि स्थानिक नागरिक एकत्र आले. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांना स्वतःहून तत्पर बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेदरम्यान एकूण ६१,२२१ लोकांनी सीपीआर शिकण्याचा संकल्प केला.

महिनाभर चाललेल्या या मोहिमेच्या अखेरीस, ‘एका महिन्यात सीपीआर शिकण्यासाठी सर्वाधिक संकल्प मिळवल्याबद्दल’ ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स™’ (GUINNESS WORLD RECORDS™) कडून अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईला अधिकृतपणे जागतिक विक्रमाचा किताब बहाल करण्यात आला. अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन डॉ. प्रीथा रेड्डी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष कार्यक्रम पार पडला.

डॉ. प्रीथा रेड्डी (एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड) म्हणाल्या:

“गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबईकरांनी आमच्यावर अफाट विश्वास ठेवला आहे. आज ६१,००० हून अधिक लोकांनी सीपीआर शिकण्याचा घेतलेला संकल्प एका उदात्त हेतूसाठी एकत्र आलेल्या समाजाची ताकद दाखवतो. याच प्रेरणेतून ‘माय हँड्स आर रेडी’ ही मोहीम उभी राहिली असून, भारताच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांना जीव वाचवण्याचे ज्ञान देणे हे आमचे ध्येय आहे. नवी मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड लाखो नागरिकांचे हात एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी तयार करून करण्यापेक्षा दुसरा मोठा मार्ग असूच शकत नाही.”

भारतातील आकडेवारी आणि वास्तव: भारतात दरवर्षी अंदाजे ७ लाखांहून अधिक लोकांचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने (सडन कार्डिॲक अरेस्ट) मृत्यू होतो. रुग्णालयाबाहेर हृदयविकाराचा झटका आलेल्या केवळ १.३% ते ९.८% लोकांनाच आजूबाजूच्या लोकांकडून तातडीने सीपीआर मिळतो. शहरी भागात केवळ २% ते ६.५% सामान्य लोकांनाच सीपीआर कसा द्यायचा हे माहीत असते. परिणामी रुग्णालयाबाहेर हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण २% ते ३% पेक्षाही कमी आहे. ही आकडेवारी स्पष्ट करते की, डॉक्टरांची मदत येण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांना प्राथमिक मदत करण्यासाठी तयार करणे किती गरजेचे आहे. ‘माय हँड्स आर रेडी’ मोहिमेद्वारे अपोलो हॉस्पिटल्स लोकांच्या मदतीच्या इच्छेला प्रत्यक्ष कौशल्यात आणि आत्मविश्वासात बदलण्याचे काम करत आहे.

श्री. अरुणेश पुनेठा (रिजनल सीईओ – वेस्टर्न रिजन, अपोलो हॉस्पिटल्स) म्हणाले:

“हा संदेश आम्हाला नवी मुंबईपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभरात न्यायचा आहे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचा जीव धोक्यात असताना जवळचा नागरिक आत्मविश्वासाने पुढे येऊ शकेल. ही केवळ एक मोहीम नसून समाजासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक जिवासाठी केलेली एक बांधिलकी आहे. ‘माय हँड्स आर रेडी’च्या माध्यमातून आम्ही एकमेकांना आणि संपूर्ण देशाला दिलेले हे एक वचन आहे.”

डॉ. नितीन जगासिया (रिजनल डायरेक्टर – इमर्जन्सी, वेस्टर्न रिजन, अपोलो हॉस्पिटल्स) म्हणाले:

“जेव्हा एखाद्याचे हृदय अचानक बंद पडते, तेव्हा तिथे पोहोचणारी पहिली व्यक्ती बहुधा डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी नसतो; तर कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी किंवा वाटसरू असतो. अशा वेळी परिस्थिती ओळखणे आणि तत्काळ सीपीआर सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे प्राथमिक जीवनरक्षक कौशल्य शिकण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हाच या मोहिमेचा मूळ हेतू आहे.”

या संपूर्ण मोहिमेचा मुख्य विचार अत्यंत साधा आहे: आपल्या हातांमध्ये काळजी घेण्याची, मदत करण्याची आणि रक्षण करण्याची ताकद आधीपासूनच आहे. फक्त योग्य ज्ञान आणि प्रशिक्षणाने हेच हात एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी सज्ज होऊ शकतात.

अपोलो हॉस्पिटल्सबद्दल थोडक्यात: १९८३ मध्ये डॉ. प्रताप रेड्डी यांनी चेन्नई येथे पहिल्या रुग्णालयाची स्थापना केली. आज अपोलो ही जगातील सर्वात मोठी एकात्मिक आरोग्य सेवा संस्था आहे. यामध्ये ७६ रुग्णालयांमध्ये १०,४०० हून अधिक बेड्स, ७,११३ पेक्षा जास्त फार्मसी, ३०८ क्लिनिक्स, २,४५७ तपासणी (डायग्नोस्टिक) केंद्रे आणि ८०० हून अधिक टेलिमेडिसिन केंद्रे कार्यरत आहेत. ३,००,००० हून अधिक अँजिओप्लास्टी आणि २,००,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रियांसह अपोलो हे जगातील आघाडीचे कार्डिॲक केअर सेंटर ठरले आहे.

IPRoyal Pawns