रितेश देशमुखने वाढवला छत्रपतींचा मान, बनवला ‘राजा शिवाजी’ चित्रपट महान
सचिन चिटणीस….
या चित्रपटाला मिळत आहेत चार स्टार
छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा म्हणजे फक्त इतिहास नाही, तर प्रेरणा आहे!
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारले तरी लाखो करोडो लोकांचं रक्त सळसळत छाती अभिमानाने फुलून येते अशा या महान राजावर चित्रपट बनवणे म्हणजे एक मोठ आव्हान होतं आणि रितेश विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते लीलया पेललं आहे, या चित्रपटात रितेश यांनी अभिनय, काही प्रमाणात लेखन व दिग्दर्शन केल आहे.
महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख यांची महाराजांप्रती असलेली आदर, श्रद्धा, प्रेम क्षणोक्षणी जाणवते. युद्धाचे प्रसंग, दृश्य आणि संवाद यांना त्यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
रितेश आणि जेनेलिया यांना पडद्यावर पाहणे एक सुखद अनुभव आहे. या चित्रपटात ते महाराज आणि सईबाईंच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यातील काही भावनिक आणि सुंदर क्षण या चित्रपटात गुंफले गेले आहेत.
मुख्य म्हणजे या चित्रपटात हिंदीतील अनेक मोठे कलाकार जोडले गेले आहेत. विद्या बालन यांनी बडी बेगमची भूमिका साकारली आहे. तिच्या देहबोलीतून आणि अभिनयातून तिने एक उत्तम अभिनेत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अभिषेक बच्चन यांनी शंभू राजांची भूमिका उत्तम रित्या साकारली आहे. भाग्यश्री यांनी जिजाऊंची भूमिका केली आहे, पण त्यात कुठेतरी कमतरता जाणवते. याशिवाय महेश मांजरेकर, अमोल कोल्हे, फरदीन खान, जितेंद्र जोशी असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.
प्राजक्त देशमुख यांचे संवाद अनेक ठिकाणी सुंदर आहेत. अजय-अतुल यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत चित्रपटाची भव्यता वाढवणारे आहे. हा चित्रपट भव्य स्वरूपात सादर होत असल्याने व्हिज्युअल ट्रीट म्हणूनही उत्तम वाटतो. काही दृश्यांमध्ये थोडी कमतरता जाणवते, सुरुवातीला चित्रपट थोडा रेंगाळणारा वाटतो , पण उत्तरार्ध मात्र सुंदर जमून आला आहे.
महाराजांच्या शौर्याची गाथा आणि रितेश देशमुख यांची महाराजांप्रती असलेली श्रद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तसेच क्लायमॅक्समध्ये सलमान खानची एन्ट्री आणि त्याच्या तोंडी असलेले मराठी संवाद हे या चित्रपटाचे खास आकर्षण असून “शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायच” या वाक्यावर चित्रपटगृहात शिट्या व टाळ्या वाजतात.
संगीत (अजय-अतुल)
या चित्रपटाचे संगीत ‘अजय-अतुल’ यांनी दिले आहे. शिवरायांच्या शौर्याला साजेशी अशी ऊर्जा त्यांच्या संगीतातून मिळते. विशेषतः चित्रपटातील ‘पोवाडा’ आणि पार्श्वसंगीत (Background Score) युद्धाच्या प्रसंगांमध्ये अंगावर शहारे आणणारे आहे.
निर्मिती आणि दोन भाषा
हा चित्रपट केवळ मराठीतच नाही, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहोचावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांनी मिळून याची मोठी निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक म्हणून रितेश
‘वेड’ या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर रितेश देशमुख यांनी या ऐतिहासिक चित्रपटासाठी खूप मोठी जोखीम पत्करली होती. त्यांनी या चित्रपटासाठी केवळ अभिनयच नाही, तर ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास केल्याचे त्यांच्या कामातून दिसून येते.
एकूण काय तर प्रत्येक शिवभक्ताने हा चित्रपट पहावयास हवा, त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव असेल.
































