डीएचएल एक्सप्रेसकडून भारतात दर 8.9 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा
मुंबई, 28 सप्टेंबर 2026: जगातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कुरिअर आणि लॉजिस्टिक्स कंपनी ‘डीएचएल एक्सप्रेस’ने भारतात आपल्या दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार असून, भारतातील सेवा शुल्कात सरासरी 8.9 टक्क्यांची वाढ होणार आहे.
डीएचएल एक्सप्रेसचे दक्षिण आशिया विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (SVP) आर. एस. सुब्रमण्यम म्हणाले, “आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे व्यवसायांना सातत्याने नव्या संधी मिळत आहेत; मात्र त्याच वेळी जागतिक पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अधिकाधिक जोडली जात असून गुंतागुंतीची होत आहे. या बदलत्या वातावरणात ग्राहकांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यासाठी आम्ही आमचे जागतिक नेटवर्क, डिजिटल यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक सेवा यांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहोत. दरवर्षी केली जाणारी ही दरवाढ आम्हाला सेवेचा दर्जा आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यास मदत करते, जेणेकरून आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत आमचे कामकाज अधिक सक्षम ठेवू शकू.”
डीएचएल एक्सप्रेस महागाईचा प्रभाव, चलनातील चढ-उतार आणि उद्योग क्षेत्रातील वाढता खर्च लक्षात घेऊन दरवर्षी आपल्या शुल्कात बदल करते. ही कंपनी 220 पेक्षा जास्त देश व प्रदेशांमध्ये काम करत असल्याने, केवळ स्थानिक परिस्थितीच नव्हे, तर जागतिक बाजारातील बदलांचाही तिच्या कामकाजावर परिणाम होतो.
महागाईव्यतिरिक्त इंधनाचा खर्च, विविध देशांतील नियामक व सीमाशुल्क (कस्टम) नियम, सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रशासकीय खर्च आणि वाढता कामगार खर्च यामुळे कंपनीचा प्रत्यक्ष खर्च वाढत आहे.
ग्राहकांच्या व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी आणि उच्च दर्जाची आंतरराष्ट्रीय सेवा टिकवण्यासाठी कंपनी आपल्या पायाभूत सुविधा, विमानांचा ताफा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सुरक्षा यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. कंपनीने नुकतीच 28 ‘बोईंग 777 फ्रेटर’ विमानांची डिलिव्हरी पूर्ण केली असून, इंधनाची बचत करणारी नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट केली आहेत. याशिवाय 2026 मध्ये कंपनीच्या 500 हून अधिक केंद्रांना आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे (‘टापा’ – TAPA) प्रमाणपत्र मिळाले आहे.
ग्राहकांना सीमेपलीकडील पार्सल पाठवणे सोपे जावे यासाठी डीएचएल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘मायएक्सप्रेस’ (MyDHL+) प्लॅटफॉर्मचा वापर वाढवत आहे. तसेच, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनी पर्यावरणपूरक विमानांचे इंधन (SAF), विजेवर चालणारी वाहने आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या सुविधांवर भर देत आहे.
डीएचएल एक्सप्रेसच्या सेवा आणि सुधारित दरांबद्दल सविस्तर माहितीसाठी dhl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.





























