*छत्रपती संभाजी महाराजांची गाथा आता ‘शंभू राजा’ रॅपमधून नव्या अंदाजात, संगीतकार ब्रम्हाचा अनोखा प्रयोग*
*अभिनेते सुनील गोडबोले यांच्या भूमिकेतून मुलांना इतिहासाची प्रेरणा, उलगडला संभाजी महाराजांचा पराक्रम*
*’शंभू राजा’ रॅपच्या तालावर जिवंत झाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, संगीतकार ब्रम्हा मार्फत प्रेरणादायी कथा समोर*
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित एक आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग ‘शंभू राजा’ हे नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. इतकंच नाहीतर अल्पावधीतच हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. आधुनिक रॅपच्या माध्यमातून इतिहास मांडण्याचा हा अनोखा प्रयत्न मानला जात आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन ब्रम्हा यांनी केले आहे. त्यांच्या सर्जनशील दिग्दर्शनामुळे पारंपरिक इतिहास आणि आधुनिक संगीत यांचा सुंदर संगम या गाण्यांत साधला गेला आहे. विशेष म्हणजे, या रॅप साँगमध्ये लहान मुलांचा अभिनय पाहायला मिळतो, ज्यामुळे गाण्याला एक वेगळीच भावनिक आणि शैक्षणिक छटा लाभली आहे.
या गाण्यात अभिनेते सुनील गोडबोले यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि विचारांची ओळख करून दिली आहे. त्यांच्या संवादातून मुलांना इतिहासाची प्रेरणा मिळताना दिसते. छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठी केलेले बलिदान यांचे प्रभावी चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. रॅपच्या तालावर सादर झालेला हा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न या चिमुकल्यांनी केला आहे.
‘ब्रम्हा ऑफिशिअल’ प्रस्तुत ‘शंभू राजा’ हे गाणं संगीत दिग्दर्शक ब्रम्हा यांचे आहे. तर या गाण्याचे बोल ब्रम्हा आणि ओंकार राज यांचे आहे. तर या गाण्याच्या व्हिडीओचे दिग्दर्शन मनीष महाजन यांचे आहे. अभिनेते सुनील गोडबोले आणि बालकलाकार अद्विका सातपुते यांच्या मुख्य भूमिका गाण्यात पाहायला मिळत आहेत. एकूणच, हे ऐतिहासिक रॅप साँग केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून, नव्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.






























