*३५० प्रयोगांचा यशस्वी टप्पा गाठलेलं ‘प्रपोजल’ नव्या संचासह रंगमंचावर; अश्विनी कासारने उलगडली भूमिकेमागची तयारी!*
*मुंबई :* मराठी रंगभूमीवर आपल्या वेगळ्या कथानकाने, अनपेक्षित नाट्यमय वळणांनी आणि प्रभावी मांडणीने प्रेक्षकांची पसंती मिळवलेले ‘प्रपोजल’ हे नाटक तब्बल ३५० यशस्वी प्रयोगांचा टप्पा पार केल्यानंतर नव्या संचासह पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल होत आहे. रंगनील निर्मित आणि सौ. कल्पना विलास कोठारी प्रस्तुत या नाटकाचे लेखन सुरेश चिखले यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा राजन ताम्हाणे यांनी सांभाळली आहे. या नव्या पर्वात अभिनेत्री अश्विनी कासार आणि अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. जुन्या यशाची परंपरा कायम राखत नव्या कलाकारांच्या ऊर्जेने सजलेले हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे.
मुंबईच्या लोकल ट्रेनच्या डब्यात घडणारी कथा, त्यातील अनपेक्षित घडामोडी आणि त्यातून उलगडणारे वास्तव हे ‘प्रपोजल’चे वैशिष्ट्य आहे. या नाटकातील व्यक्तिरेखा साकारताना अश्विनी कासारने मुंबई लोकलशी जोडलेल्या स्वतःच्या आठवणी आणि दैनंदिन प्रवासातील निरीक्षणांचा आधार घेतला आहे. पात्राची देहबोली, वागण्या-बोलण्यातील बारकावे समजून घेण्यासाठी तिने वाचन, प्रत्यक्ष निरीक्षण आणि ऑनलाइन अभ्यासाचीही मदत घेतली. मात्र, व्यक्तिरेखा नेमकेपणाने उभी करण्यात दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे अश्विनी सांगते.
दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि सहकलाकार अक्षय केळकर यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना अश्विनी म्हणते, “मी नेहमीच स्वतःला दिग्दर्शकाची अभिनेत्री मानते. दिग्दर्शकाच्या मनात असलेली कल्पना आणि त्यांना अपेक्षित असलेले रंगमंचीय चित्र साकारण्यात मला विशेष आनंद मिळतो. राजन ताम्हाणे सरांसोबत सुरुवातीपासूनच संवादाची छान नाळ जुळली. या नाटकाच्या नव्या पर्वाचा प्रवास हा आपणा तिघांचाही असेल, असा त्यांचा विश्वास ऐकल्यानंतर मनावरील दडपण बऱ्याच अंशी कमी झाले. अक्षयसोबत यापूर्वी एका मालिकेत काम केले होते. त्यानंतर त्याचा अभिनेता म्हणून झालेला प्रवास पाहून खूप आनंद वाटतो. तालमीदरम्यान आमच्यात रंगणाऱ्या गप्पा आणि धमाल यांची एक वेगळीच मजा आहे. त्यातून रंगमंचावरही छान केमिस्ट्री पाहायला मिळेल, असा विश्वास आहे.”
३५० प्रयोगांचा यशस्वी इतिहास असलेल्या नाटकाचा भाग होण्याबद्दल अश्विनी पुढे सांगते, “कोणतीही चांगली व्यक्तिरेखा साकारताना मनात एक हवंहवंसं दडपण असतंच. कारण हेच दडपण आपल्याला अधिक एकाग्रतेने आणि तीव्रतेने काम करण्याची प्रेरणा देतं. इतके प्रयोग गाजलेल्या नाटकात काम करताना आधीच्या यशाचा आदर राखून त्यात स्वतःचं वेगळेपण आणणं हे निश्चितच आव्हानात्मक आहे. मात्र, राजन ताम्हाणे सरांचं मार्गदर्शन, अक्षयसोबत जुळलेली टीम आणि या नव्या प्रवासाचा भाग होण्याची संधी यामुळे मनात उत्साह आणि आनंद दोन्ही आहेत.”
या नाटकाला प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि राहुल रानडे यांचे संगीत लाभले आहे. मनाली रायसोनी निर्मिती प्रमुख असून, दीपक गोडबोले सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. दर्जेदार संहिता, अनुभवी दिग्दर्शन आणि नव्या संचातील कलाकारांची ऊर्जा यांची सांगड घालत संपूर्ण टीम नाटकाच्या नव्या पर्वासाठी मेहनत घेत आहे. ३५० प्रयोगांची यशस्वी परंपरा पुढे नेत ‘प्रपोजल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार का, याची उत्सुकता आता नाट्यरसिकांना लागली आहे.































