दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी म्हणताहेत ‘आता वेळ झाली’
दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी या जोडप्याने दाखवली ‘आता वेळ झाली’ म्हणायची हिंमत,
अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन असलेला सक्रीय इच्छामरणावरील हा पहिलाच चित्रपट होतोय हिवाळ्यात प्रदर्शित
वयस्क व्यक्तींच्या आयुष्यात अस्तित्त्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा, असे वाटू लागते. ‘आता वेळ झाली’ या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित असून हा चित्रपट यंदाच्या हिवाळ्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सध्याच्या स्थितीत मानवी मुल्ये जपणाऱ्या कोणाच्याही मनात द्विधा परिस्थिती निर्माण करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन या पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने केले असून सोबतीला भक्कम अशी कलाकारांची फळी आहे.
दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोलकर असे दमदार कलाकार या चित्रपटात असून त्याची निर्मिती दिनेश बन्सल (इमॅजीन एंटरटेन्मेट अँड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड)ची आहे.
हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवणारी, काहीशी गमतीदार आणि तरीही भावनात्मक आहे. दोन जीवांची ही कथा प्रेरक साहसी आहे आणि तरीही ती अस्तित्वाबद्दल चक्रावून टाकणारे प्रश्न निर्माण करणारीसुद्धा आहे. त्यांचा हा प्रवास एक हवाहवासा सिनेमॅटीक अनुभव देवून जातो. दिनेश बन्सल (इमॅजीन एंटरटेन्मेट अँड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड), अनंत महादेवन (अनंत महादेवन फिल्म्स), जी के अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयवंत वाडकर, अभिनव पाटेकर हे इतर कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
“मला नेहमीच अस्सल चित्रपट बनवायचा होता. असा चित्रपट कि जो सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असेल आणि वास्तववादी असेल. ‘आता वेळ झाली’चा विषय मला प्रत्येक पिढीला खिळवून ठेवेल तसेच आयुष्याबद्दल व अस्तित्त्वाबद्दल पुनर्विचार करायला लावेल असा वाटला. हा विषय असा आहे की त्यावर याआधी चर्चा झालेली नाही. त्यामुळेच सुरुवात करण्यासाठी मला हा एक आदर्श चित्रपट वाटला,” असे उद्गार निर्माते दिनेश बन्सल यांनी काढले.
तसे पहिले तर हृषीकेश मुखर्जी यांच्या सदाबहार ‘आनंद’ची ही दुसरी बाजू आहे. इथे मृत्यूला हसून सामोरे जाण्याची गोष्ट नाही तर आयुष्याच्या अंतामध्ये संपूर्णपणे हसत राहण्याची गोष्ट आहे. कोविड साथरोगाच्या काळात सक्रीय इच्छामरण हा विषय माझ्या मनात रुंजी घालत होता. त्यावेळी संपूर्ण जग आयुष्य आणि मृत्यू यांकडे संपूर्णतः वेगळ्या नजरेने पाहत होते. अगदी युवकही आयुष्याकडे भौतिकवादी दृष्टीने पाहण्याऐवजी व्यावहारिक दृष्टीने पाहू लागले होते. जगभरातील चित्रपट महोत्सावांमधील प्रेक्षक हा चित्रपट पाहिल्यावर याच मताचे बनले. चित्रपट पाहिल्यावर ते निस्तब्ध झाले होते आणि वयस्क लोक तर साश्रू नयनांनी व्यक्त होत होते. युवा प्रेक्षकांनी आयुष्यातील ही बाब अगदी गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मान्य केले,” असे उद्गार अनंत नारायण महादेवन यांनी काढले. या चित्रपटात ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अशा तिहेरी भूमिकेत आहेत.
‘आता वेळ झाली’ हा आत्तापर्यंत कित्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवडला गेला आहे. डल्लास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण फिल्म फेस्टिव्हल यांचा त्यात समावेश आहे.
प्रदीप खानविलकर यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून कुश त्रिपाठी, अनंत नारायण महादेवन यांनी त्याचे संकलन केले आहे. सिंक साऊड अँड साउंड डिझाईन हे भगत सिंग राठोड यांचे असून पार्श्वसंगीत संजय चौधरी यांचे आहे. अपर्णा शाह यांनी रंगपटाची जबाबदारी घेतली असून महेंद्र पाटील यांनी मराठी रूपांतरण केले आहे.
अनंत महादेवन हे अनेक चित्रपटांचे पुरस्कार विजेते दिग्दर्शक असून त्यांमध्ये ‘मी सिंधुताई सकपाळ’ (२०१०) तसेच ‘गौर हरी दास्तान : द फ्रीडम फाईल’, ‘रफ बुक’, ‘डॉक्टर रखमाबाई’ आदींचा समावेश आहे. हे सर्वच चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवडले गेले आहेत. ‘हिज माई घाट : क्राइम नंबर १०३/२००५’ (२०२०) या चित्रपटाची निवड भारतीय माहिती व नभोवाणी मंत्रालयाने भारताचा अधिकृत चित्रपट म्हणून कान्स चित्रपट महोत्सवातील मार्च डू फिल्म विभागात केली होती.
‘बिटरस्वीट’ हा त्यांचा चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२०मध्ये अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविला गेला होता. त्याचे नामांकन प्रतिष्ठीत अशा किम जिसेऑक पुरस्कारासाठी झाले होते. त्यांचा नवीन चित्रपट ‘द स्टोरीटेलर’ हा सत्यजित राय यांच्या अस्सल बंगाली कथेवर बेतलेला आहे. तो बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धेत अधिकृत प्रवेशिका म्हणून तसेच आयएफएफआय (गोवा) २०२२ मध्ये पाठवला गेला होता.
त्यांचे पहिले पुस्तक ‘वन्स अपॉन अ प्राईम टाईम’ला खूप मोठ्या प्रमाणावर प्रशंषा आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे पुस्तक त्यांच्या भारतीय टीव्ही क्षेत्रातील ४० वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे.