‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये सयाजी-गिरीशच्या अभिनयाची जुगलबंदी!
११ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
प्रत्येक कलाकृतीचे आपले एक नशीब असते. लेखक कथेला जन्म देतो, दिग्दर्शक कलाकार-तंत्रज्ञांची जमवाजमव करतो आणि निर्माते सर्वांना एकत्र घेऊन चित्रपट तयार करतो. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा शीर्षकापासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या चित्रपटासाठीही संपूर्ण टिमने खूप मेहनत घेतली आहे. विविध वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट ११ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीपासून दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आणि मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी अभिनय करणारे लेखक-अभिनेता गिरीश कुलकर्णी यांची जुगलबंदी हे या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. विजय नारायण गवंडे आणि श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे दिग्दर्शन प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा संतोष शिंत्रे यांनी लिहिली असून, तर प्रसाद नामजोशी यांनी दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनही केले आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने सयाजी आणि गिरीश यांनी प्रथमच एकत्र काम केले आहे. दोघेही तगडे कलाकार असून, दोघांचीही आपापली वेगळी अभिनयशैली आहे. आजवर सयाजी शिंदे यांनी काही थरारक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, तर गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेल्या विनोदाची किनार जोडलेल्या व्यक्तिरेखा रसिकांना मोहिनी घालणाऱ्या ठरल्या आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये दोघेही शिक्षकी भूमिकेत दिसणार आहेत. सयाजी शिंदे यांनी कलंत्रे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. झेड. कलंत्रे यांची भूमिका साकारली आहे, तर गिरीश कुलकर्णी विद्यापीठात ‘पावटॉलॉजी’ हा नवीन विभाग सुरू करणाऱ्या प्राध्यापक सुधन्वा दिवेकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांच्या निवडीबाबत दिग्दर्शक द्वयी म्हणाले की, सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी हे दोघेही तोलामोलाचे अभिनेते आहेत. चित्रपट लिहितानाच त्यांचे चेहरे डोळ्यांसमोर येणे आणि त्यांनी चित्रपटात काम करायला होकार देणे हे खऱ्या अर्थाने ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’साठी फायदेशीर ठरले. दोघांच्याही अभिनयात एक शिस्त आहे. कॅमेरा आॅफ झाल्यावर दंगा-मस्ती हा जणू शूटिंगचा एक भागच बनला होता. त्यांच्या जोडीला इतर कलाकारांनीही आपापल्या व्यक्तिरेखा चोख बजावल्याने ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या रूपात प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा परिपूर्ण चित्रपट पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
या चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, कृतिका देव, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. संगीत विजय नारायण गवंडे यांचे असून, कला दिग्दर्शन निलेश गोरक्षे यांनी केले आहे. मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी आरेखन, तर गिरीश जांभळीकर छायांकन केले आहे. रश्मी रोडे यांनी वेशभूषा, श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली असून, प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांनी निर्मितीव्यवस्था सांभाळली आहे. कार्यकारी निर्माते सागर वंजारी यांनी संकलनही केले असून, व्हीएफएक्स अमिन काझी यांचे आहेत.