मराठी विश्व संमेलनाचा भव्य शुभारंभ; ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्कार प्रदान
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन भाषणात*
उदय सामंत मगाशी सांगत होते की, काही लोकांनी विश्व मराठी संमेलनावरून वाद निर्माण केला. तुम्हाला मी सांगू शकतो की साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपल्या मराठी माणसाचा स्थायीभाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत. त्यामुळे वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्या पुस्तकात सांगितलेले आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे. कोणी नाव ठेवते, कोणी चांगले म्हणते, त्यातूनच चांगले करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते, असे त्यांनी यावेळी उदय सामंत यांना म्हटले.
मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही. अलीकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदय जी मी तुमचे आभार मानतो की, तुम्ही संमेलनाला मुंबईतून पुण्यात आणले. माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिले संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी जी यांचे आभार मानतो. मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार आपण करतो आहोत, सृजनशील व्यक्तिमत्व आज नाबाद 93 आहेत ते मराठीला समृद्ध करणारे आहेत. मराठीचा विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराशिवाय ते पूर्ण नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे त्यांनी म्हटले.
राज्य शासनातर्फे आयोजित मराठी विश्व संमेलनाचे पुण्यात भव्य उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या मान्यतेबद्दल गौरवोद्गार काढताना, उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मराठी माणसाचे अभिजात भाषेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.
यावेळी पुणेकरांनी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ७ ते ८ हजार मराठी युवकांनी भव्य शोभायात्रेत सहभाग घेत संमेलनाचा उत्साह द्विगुणित केला.
*मालगुंड – ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित करण्याचा विचार*
केशवसुत यांचे जन्मगाव मालगुंड मधू मंगेश कर्णिक यांनी जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्यामुळे मालगुंडला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी जाहीर केले. तसेच राज्यातील इतरही गावांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार विशेषण देण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*मराठी भाषकांच्या सन्मानासाठी ठाम भूमिका*
महाराष्ट्रात विविध भाषिक समुदायांचे सहअस्तित्व आहे. मराठी माणूस इतर भाषांचा सन्मान करतो, मात्र मराठी भाषिकांना हेतुपुरस्सर त्रास दिला गेला, तर त्यावर कठोर कायदा करण्याची मागणी महाराष्ट्रातील युवकांकडून होत आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
*परदेशातील मराठी भाषेच्या प्रचारासाठी भरीव कार्य*
मराठी भाषा संवर्धनासाठी परदेशातील संस्थांचे योगदान उल्लेखनीय आहे. काहींकडून परदेश दौऱ्यांवर टीका केली जात असली, तरी या प्रवासादरम्यान परदेशस्थ मराठी बांधव आपले स्वागत करतात आणि मराठी भाषेच्या जतनासाठी निस्वार्थ कार्य करतात, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सध्या २५ देशांमध्ये मराठी भाषा प्रचारासाठी कार्यरत असलेल्या संस्था कार्यरत आहेत. यापूर्वी या संस्था १७ होत्या, परंतु आता त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मराठीचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी शासन व विविध संस्था सातत्याने कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.