विश्व मराठी संमेलन २०२५ – सांगता समारंभ दिमाखात संपन्न
राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान
मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार – मंत्री उदय सामंत
पुणे, २ फेब्रुवारी २०२५ – मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५ चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक सदानंद मोरे, उल्लासदादा पवार, लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, राजेश पांडे, रवींद्र शोभणे आदी मान्यवर उपस्थित होते.
समारंभात राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना “कलारत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना रितेश देशमुख यांनी मराठी कला आणि सिनेविश्वातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राज ठाकरे यांचे साहित्यिकांना मार्गदर्शनाचे आवाहन
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “पूर्वी साहित्यिक राजकीय आणि सामाजिक विषयांवर स्पष्ट मत मांडत असत. मात्र, आज तसे दिसत नाही. केवळ पुस्तके लिहून उपयोग नाही, तर साहित्यिकांनी समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे. मराठी पुस्तकांमधील ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने पुढे जाणे गरजेचे आहे.”
मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार – मंत्री उदय सामंत
या वेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, “राज ठाकरेंच्या हस्ते रितेशचा सत्कार व्हावा, ही आमची इच्छा होती. आज व्यासपीठावरून राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. मराठीच्या भल्यासाठी आणि संवर्धनासाठी ज्या काही सूचना येतील, त्या पूर्ण करण्याची ग्वाही मी मराठी भाषा मंत्री म्हणून देतो.”
पुणेकरांची उत्स्फूर्त उपस्थिती
या भव्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यास हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरला.