मी जे काय करत गेलो ते लोकांना आवडत गेलं म्हणून मी स्वतःला फार नशीबवान माणूस म्हणून घेतो – अशोक सराफ
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने यशवंत नाट्यगृहाध्ये पुरस्कार वितरण, कलावंत मेळावा आणि यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यानिमित्ताने “नाट्यकलेचा जागर’चे सादरीकरण करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले, – हा खूप मोठा आनंदाचा दिवस असून मला तो शब्दातीत करणं कठीण जातय कारण सुरुवात झाल्यानंतर मला एका लाईनीत मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. आणि चारही पुरस्कार खूप मोठे आहेत. पुरस्कार मिळालेत, मिळताहेत, मिळत राहतील पण कुठून मिळतात कोणाच्या हस्ते मिळतात कुठल्या संस्थेतर्फे मिळतात हे शेवटी महत्त्वाचं राहतं. नाट्य परिषदेतर्फे मिळालेला हा पुरस्कार मला अधिक आनंद देऊन जातो आणि त्यात माझ्या अत्यंत आवडत्या माणसाकडून हा मला पुरस्कार मिळत आहे ते म्हणजे आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब.
नाटक करणे फार सोपी गोष्ट नाहीये खूप कठीण आहे. ते मिळवणे फार कठीण आहे मात्र त्याच्यापेक्षा कठीण आहे ते टिकवण. आपला मराठी माणूस नाटकाच्या बाबतीत खडूस आहे तुम्ही कसे दिसता या गोष्टीला त्याच्याकडे महत्व नाहीये. तुम्ही काय करताय या गोष्टीला त्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. आणि ते तसं नसतं तर दादा कोंडके निळू फुले लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांना मराठी चित्रपट सृष्टीत हिरो व्हायच्या काहीही अधिकार नव्हता. ज्यांनी ज्यांनी चांगले काम केली त्यांच्या पाठीमागे मराठी माणूस उभा राहिला आणि मी म्हणतो त्याच्यच हे फलित आहे म्हणजे आजचा मला मिळालेला पुरस्कार.
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान घरातून शाबासकीची थाप देणारा आहे. एनएसडीतून १९७४ साली बाहेर पडले. त्या गोष्टीला २०२४ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत असताना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेद्वारे माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला. हातपाय चालतील तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करत राहीन.- रोहिणी हट्टंगडी
नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त उदय सामंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, राज्यातील नाट्यगृहे, सभागृहांना भरावा लागणारा करमणूक कर, देखभाल दुरूस्तीचा खर्च आणि वीजबील या संदर्भात राज्य सरकारने एक धोरण निश्चित करावे, यासाठी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, मी त्यावेळी येईन, असे पवार यांनी सांगितले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी परिषदेने केलेले कार्य सांगत त्याच धर्तीवर राज्यातील नाट्यगृहांची दुरावस्था दूर करण्यासाठी राज्यातील नाट्यगृहे ही परिषदेकडे द्यावीत, अशी मागणी राज्यसरकारकडे करणार असल्याचे सांगितले.
यानिमित्ताने “नाट्यकलेचा जागर’चे सादरीकरण करण्यात आले.