लेखक : श्रीराम खाडिलकर
विचार कळला ते भाग्यवंत
गेले दहा दिवस साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचा आजच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी समारोप केला जातो. आज सकाळीच अखेरची आरती आणि निरोपाचं भजन गणरायासमोर सादर करून विसर्जनासाठी मार्गस्थ होण्याची वेळ येते. या क्षणाला प्रत्येक भाविकांचे डोळे पाणावलेले असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येक भाविक या विघ्नहर्ता गणरायाची सेवा करण्याची भावना मनात ठेवून त्याच्यासाठी शक्य त्या गोष्टी करत असतात. मुळात घराघरात गणपती अनेक वर्ष बसवले जात असले तरी खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं ते लोकमान्य टिळकांनी. १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी मुंबईत जनतेला आवाहन करून गिरगावातल्या केशवजी नाईक चाळ या ठिकाणी पहिला सार्वजनिक गणपती बसवायला सुरुवात झाली. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं ब्रिटिशांविरुद्ध चाललेला लढा तीव्र करण्यासाठी सर्वसामान्यांना एकत्र आणता येईल ही त्या मागची मुख्य भावना होती. आज ब्रिटिशांविरुद्धचा लढा जरी नसला तरी या निमित्तानं अनेक मुंबईकर मात्र एकत्र आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे या घटनेपासून यंदाचा हा १३१ वा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणावा लागेल. पूर्वीचं विसर्जनाचं स्वरूप आणि आजचं स्वरूप यात फार मोठा बदल झाला आहे. टिकून राहिल्या आहेत त्या परंपरेनं, श्रद्धेनं गणपती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या गणपतीच्या मूर्ती. केशवजी नाईक चाळीतल्या गणपती उत्सवाच्या आज उपलब्ध असलेल्या पूर्वीच्या फोटोंवर नजर टाकली तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. गणपतीची पालखीतून मिरवणूक ही परंपरा तिथे जपलेली दिसते. केशवजी नाईक चाळीतला सार्वजनिक गणपती पूर्वीज्या रूपात होता त्याच रूपात काळ बदलला तरीही आपल्याला दिसत आला आहे. पुण्यातले पाच मानाचे गणपती जर आपण पाहिले तर त्यांच्याही गणपतीच्या मूर्ती पूर्वी जशा होत्या तशाच आजही आहेत. लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांना देशी जुगाड करण्याची गरज भासली नाही. त्यावेळी नवसाला पावणारे गणपती अशी कोणतीही कॅटेगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नव्हती. पूर्वी मंडळांमध्ये एकूणच भक्तिभावाचं दर्शन घडायचं. आज श्रीमंती थाटाचं दर्शन घडतं. डिजे, कान फाटतील अशी भीती वाटणारे ढोल ताशांचे आवाज, सूर्याला ही लाजवतील अशा प्रखर दिव्यांची रोषणाई पाहून आपण कधी त्या समुद्रात विसर्जित होऊन आपल्याला शांतता मिळतेय असं त्या गणपतीच्या मूर्तीलाही नक्कीच वाटत असणार. असो. या सगळ्यातून एक विचार मात्र नकळत सगळ्यांवर बिंबवला जातोय. तो म्हणजे जे सुंदर आणि हवंहवंसं वाटणारं आहे ते एक दिवस आपल्याच नजरेसमोर लयाला जाणार आहे . . . त्या गणरायाच्या देखण्या मूर्तीसारखं. हा विचार ज्यांना कळतो ते भाग्यवंत. (समाप्त).
*केशवजी नाईक चाळीच्या गणरायाची मिरवणूक तसेच पूजा (फोटो सौजन्य-श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईक चाळ.)*