‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे अजरामर महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक शाहिरांच्या आठव्या स्मृतीदिनी सोमवारी २० मार्च रोजी राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. शाहिरांची ही जीवनगाथा म्हणजे रसिकांसाठी गाण्यांच्या रूपातील एक पर्वणी असणार असल्याची खात्री हा टीझर पटवून देतो. यावेळी शाहिरांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल तसेच पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. केदार शिंदेदिग्दर्शित आणि अंकुश चौधरी अभिनित ‘महाराष्ट्र शाहीर’ २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
शाहीरांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले ” कोणताही स्वातंत्र्यलढा कोणतीही सामाजिक चळवळ ही मनामनात, घराघरात पोहोचविण्याचे काम हे कलाकार लोक करत असतात. जगभरात हे झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १९६० साली आला, त्यात अनेक लोकांचे योगदान होते. पण त्याकाळात शाहिरांनी दिलेले योगदान खूप मोठे होते. अशा लोकांमुळे स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र सारखी चळवळ असो, त्या जवळ येत जातात. हे लोक मनामनात आणि घरघरात पोहोचलेले असतात. कोणतीही चळवळ सांघिक स्वरूपात नेण्यात अशा लोकांचा फार मोठा वाटा असतो. हे जगभरातील अनुभव आहे. शाहीरांचे हे सर्वात मोठे योगदान आहे. ”
” शाहिरांना मी लहानपणा पासून पाहत आलो आहे. ते आमच्या घरी माननीय बाळासाहेबांना भेटायला यायचे. मला ते ‘जय जय महाराष्ट्र माझा …’ वाले शाहीर म्हणून माहीत होते. पण शहीरांबद्दल एक गोष्ट सांगतो, की जे ठराविक लोक बाळासाहेबांना ‘ बाळ’ म्हणायचे त्यात एक शाहीर होते. आज बायोपिक बरेच येतात. त्यासाठी तो माणूसही तसा असावा लागतो. पण शाहिरांच्या या जीवनपटात एकेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येत जातात. ”
चित्रपटाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या चित्रपटात प्रत्येक फ्रेमसाठी विशेष प्रयत्न केल्याचे जाणवते. केदार शिंदे यांनी जेव्हा मला या चित्रपटाबद्दल सांगितले तेव्हा मी त्यांना विचारले की शाहिरांनी भूमिका कोण करतोय. त्यांनी जेव्हा अंकुशबद्दल सांगितले तेव्हा मी थोडीशी साशंकता व्यक्त केली. पण टिझर पाहिल्यावर नक्की सांगू शकतो की, अंकुश ने उत्कृष्टपणे शाहीर उभे केले आहेत.”
शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे यावेळी बोलताना म्हणाल्या, ” हा माझ्यासाठी एक अत्यंत हळवा प्रसंग आहे. आज मी भाऊक झाले आहे.” संगीतकार अजय – अतुल म्हणाले, ” आम्ही शहीरांकडून खूप शिकलो. त्यांच्यामुळे केदार आणि आमची मैत्री झाली. या चित्रपटाचा भाग होता आले, हे आमचे भाग्य आहे. त्यासाठी आम्ही केदारचेही आभारी आहोत.”
निर्माते संजय छाब्रिया यावेळी बोलताना म्हणाले, ” आम्ही जेव्हा मी शिवाजीराजे बोलतोयची निर्मिती केली तेव्हाही राजसाहेब आले होते. यावेळी ते आले आहेत. त्यामुळे त्यांचा आणि आमचा एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. संगीतकार अजय – अतुल यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. एक दर्जेदार चित्रपट दिल्याबद्दल केदार शिंदे यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”