कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला साठा आज (दिनांक १३ जानेवारी २०२१) सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/ दक्षिण विभागातील साठवणूक केंद्रात दाखल झाला असून या साठवणूक केंद्राची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी पाहणी केली. तसेच १६ जानेवारी २०२१ पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेविका सर्वश्रीमती पुष्पा कोळी, सिंधू मसुरकर, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी )डॉ. मंगला गोमारे उपस्थित होत्या.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही संजीवनी लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली असून एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातील तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले असून सद्यस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लसीची लसीकरणासाठी नोंदणी झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. २ ते ८ डिग्री सेंटीग्रेड तापमानात ही लस ठेवण्यात आली असून एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. या ठिकाणी सुद्धा संपूर्ण लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच कांजूरमार्ग येथे पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये लसीकरणासाठी शितगृह केंद्र तयार करण्यात येत असून त्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात असल्याचे महापौरांनी सांगितले. लसीबाबत नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करून मुंबईकरांनी लस्सीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे,असे आवाहन महापौरांनी यानिमित्ताने केले आहे. या लसीकरण मोहिमेसाठी पाच हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून दहा हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे महापौरांनी विशेषत्वाने नमूद केले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरणासाठी सज्ज असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाच टप्प्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. पंधरा लसीकरण केंद्रांपैकी नऊ ठिकाणी ड्राय रन घेण्यात आली असून उर्वरित सहा ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी ड्राय रन घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी सांगितले. १६ जानेवारीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना त्यानंतर तिसऱ्या टप्प्यांमध्ये पन्नास वर्षावरील नागरिकांना तसेच जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.त्यानंतर चौथ्या टप्प्यांमध्ये १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त काकाणी यांनी सांगितले. लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचा नियमितपणे वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून यासाठी एक
ॲपद्वारे लघुसंदेश संबंधित व्यक्तींना जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणानंतर तीस मिनिटापर्यंत लसीकरण केंद्रात थांबणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी कुठलीही भीती व चिंता न बाळगता टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी यावेळी केले