बाप लेकाच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा रोड ट्रीपचा ‘श्री गणेशा’
सचिन चिटणीस..
या चित्रपटाला मिळत आहेत
बाप आणि मुलाच्या नाते संबंधावर भाष्य करणारा हा चित्रपट असून बाप आणि मुलाचं नातं हे टॉम ऍण्ड जेरी सारख यात दाखवले आहे. मुलगा अशा वयात आहे की या वयात त्याच्यावर नीट संस्कार केले नाहीत तर ते मुल हातून निसटून जाईल असे बापाला वाटते त्यामुळेच घरात चोऱ्या करणारा मुलाला बाप बाल सुधारगृहात टाकतो आणि याच गोष्टीचा राग मुलाला आपल्या बापावरती असतो.
मुलाचे आईवर प्रचंड प्रेम असते त्यामुळेच आईला ब्रेन ट्यूमर सारखा भयंकर आजार झाला असून ती काही दिवसाचीच सोबती आहे. असे सांगून बाप पंधरा दिवसांसाठी मुलाला आपल्या आईला शेवटचं बघायचं आहे असे सांगून सुधारगृहातून बाहेर काढतो.
आणि मग सुरू होतो रोड ट्रिपचा एकमेकांना टपल्या मारत प्रवास, या रोड ट्रीप मध्ये मुलाचा बापावर जरी राग असला तरी छोट्या छोट्या प्रसंगातून मुलगा आपल्या बापावरती प्रेम करताना दाखवला आहे. तर बाप या रोड ट्रिप मध्ये मुलाने काय चुका केल्यात हे त्याला वेगळ्या भाषेत समजण्याचा प्रयत्न करत असतो.
एका ताणलेल्या प्रवासाची ही सुरुवात असून चित्रपट संपता संपता हे ताणलेल नातं एक छान वळण घेते.
रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती… वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, हास्य-विनोद आणि गंमती-जंमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्ही संपता संपता आपल्या डोळ्यात अश्रू उभा करतो.
‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी पुन्हा एकदा लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका प्रेक्षकांसाठी आणला आहे.
रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ट्रेलरची सुरुवातच संजय नार्वेकरने साकारलेल्या भाई वेंगुर्लेकर या व्यक्तिरेखेपासून होते. संजयसोबत शशांक शेंडे आणि प्रथमेश परब हे मुख्य भूमिकेतील कलाकारही आहेत. फूड ब्लॅागर असलेल्या नायिकेची म्हणजेच मेघा शिंदेची एन्ट्री धमाल आहे. हा चित्रपट केवळ धमाल-मस्ती नसून, याला पिता-पुत्राच्या नात्याची किनारही जोडण्यात आली असून ‘उन-सावलीचा चाले खेळ…’ हे गाणे येताच जाणवते. ‘कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही’, हा डायलॅाग मनाला भिडतो. ट्रेलरच्या शेवटी पुन्हा संजय नार्वेकरचे कॅरेक्टर आपल्या अनोख्या शैलीत भेटतो.
‘श्री गणेशा’ चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांनी लिहिली आहे. मिलिंद यांनीच संजय नवगिरे यांच्या साथीने पटकथालेखनही केले आहे. संवाद लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे यांनी सांभाळली आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी, तर संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून, नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून विनोद शिंदे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.
शशांक शेंडेचा उत्तम अभिनय, नेहमीप्रमाणेच प्रथमेश परब यांने केलेली धमाल तर मेघा शिंदेची सतत बडबड करणारी दिपाली वेंगुर्लेकर हे सर्वजण चित्रपटाला एका उंचीवर नेऊन ठेवतात.