लेखक : श्रीराम खाडिलकर
स्त्रीरुप वैनायकी
गणपतीसारखच रुप असलेली एक देवता आहे. स्त्रीचं शिर असलेली चार हातांची ही देवता चक्क गणेशाचंच स्त्रीरुप आहे असं दिसतं. या स्त्रीरुपाच्या गणेशाला वैनायकी म्हणून ओळखलं जातं. हिंदू धर्मग्रंथांमध्ये तसंच पुराणकथांमध्येही या वैनायकीबद्दल फारसे उल्लेख आढळत नाहीत.
वायु पुराणाबरोबरच स्कंद पुराणातसुद्धा हत्तीचं मुख आहेत अशा मातृका असून, हत्तीचं मुख असलेली गजानना म्हणून ती ओळखली जाते.
काही जण याच “वैनायकी”ला “विघ्नेश्वरी” आणि “गजानना” अशा नावांनीही ओळखतात. गणेशाचंच स्त्रीरूप असल्यानं गणेशाचं शक्तीरूप म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. इतकंच नाही तर वैनायकीला काहींनी मातृका देवी या अर्थानं तर काहींनी चौसष्ट योगिनींमधली एक आहे असंही मानलं आहे.
ही वैनायकी नसून हत्तीच्या डोक्याची ही मातृका, गणेशाची ब्राह्मणी शक्ती आणि तांत्रिक योगिनी या तीन भिन्न देवी आहेत असंही काही जण मानतात. तरीही तिला हत्तीचं मुख असल्यानं ही देवता सामान्यतः हत्तीच्या डोक्याच्या बुद्धीच्या देवता गणेशाशी संबंधित आहे हे नाकारता नाहीत. वैनायकी या देवतेची मंदिरंही भारतात फारशी आढळत नाहीत. मात्र तिचं अस्तित्व आजवर कुणी नाकारलेले नाही.
विनायकी नावांच्या देवतेला आपल्याकडे असलेल्या जैन तसंच बौद्ध परंपरेमध्ये स्वतंत्र अस्तित्व आहे.
हत्तीचं शिर असलेल्या देवीची सर्वात प्राचीन प्रतिमा राजस्थानमध्ये आढळते. तिथं इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या सुमाराला घडवलेला टेराकोटा माध्यमातला एक फलक आहे. या हत्तीमुखी देवीला दोन हात असून तिची सोंड उजवीकडे वळलेली आपल्याला दिसते. या प्रतिमेची बरीच मोडतोड झाली आहे त्यामुळेतिच्या हातामध्ये काय दाखवलं होतं असा अन्य तपशील काही दिसत नाही. फक्त दोन हात दाखवले असल्यानं कलियुगातील देवता म्हणूनच ती अभिप्रेत होती हे स्पष्ट होतं.
दहाव्या शतकापासून आपल्या देशात विविध ठिकाणी हत्तीचं शिर असलेल्या देवीच्या प्रतिमा सापडतात. मध्य प्रदेशातल्या भेडाघाटला धबधबा पाहण्यासाठी जसे लोक जातात तसंच तिथल्या चौसष्ठ योगिनी मंदिरासाठीही अनेक जण तिथं जातात. वैनायकीच्या प्रसिद्ध शिल्पांपैकी एक या ठिकाणी आहे. चौसष्ठ योगिनींमधली चाळीसावी योगिनी म्हणून ती ओळखली जाते. अशा अनेक प्रतिमांच्या हातात गणपतीच्या हातात असतात तशीच आयुधंही दिसतात. फक्त मोदकाऐवजी तिथं लाडू दिसतो, हाच फरक आहे.
गणेशासारखीच दिसणारी स्त्री रुपातली ही देवता असल्यानं तिचं आकर्षण आजही टिकून आहे.