लेखकांना हक्काचं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न – विशाखा कशाळकर
२७ जानेवारीला रंगणार खुली एकांकिका वाचन मंच स्पर्धा
सांघिक कला असलेलं नाटक करायचं तर टीमची गरज लागते. लेखन हा नाटकाचा आत्मा आहे. सकस लेखन असलेलं कोणतंही नाटक पाहणाऱ्यांच्या मनाला भिडतं, पण आज दर्जेदार लेखक घडवणाऱ्या व्पासपीठांची उणीव भासत आहे. विद्यार्थी दशेतील लेखकांपासून अनेक नवोदित हौशी लेखक आज विविध विषयांवर नाटके लिहितात. त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ‘विशाखा कशाळकर प्रतिष्ठान’नं ‘लेखकांसाठी खुला मंच स्पर्धा’ या मंचाची निर्मिती केली आहे. रंगभूमीच्या मशागतीचीही बाजू सांभाळायला अनेकांनी पुढे यायला हवे यासाठी ‘विशाखा कशाळकर प्रतिष्ठान’ प्रत्येक महिन्याला एकांकिका लेखकांसाठी हा उपक्रम राबवित आहे.
विशाखा कशाळकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री विशाखा कशाळकर यांच्या पुढाकाराने मागील दोन महिन्यांपासून लेखकांसाठी हक्काचं व्यासपीठ तयार झालं आहे. ‘नोंकझोक’ या हिंदी मालिकेत बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या विशाखाने अनेक मालिका, नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तिची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘व्हिसल ब्लोईंग सूट’ जागतिक व्यासपीठावर, डंका वाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्याच्या एकांकिका स्पर्धामधून अभिनेते, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, वेशभूषाकार, संगीतकार तंत्रज्ञ मिळतात, पण गेल्या काही वर्षात या एकांकिका स्पर्धामधून व्यावसायिक लेखक एकांकिकामधून घडण्याची प्रक्रिया क्षीण झाली आहे. सादरीकरणाला महत्व आल्याने संगीत, नृत्य, वेशभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्य या पूरक असणाऱ्या गोष्टी अवास्तव मोठया झाल्या. दिग्दर्शकीय आकृतीबंध टाळ्या घेऊ लागले. कॅरेक्टर्स हरवली आणि कॅरिकेचर्स भाव खाऊ लागली. रंगमंचावर पात्र अंधुक झाली. गर्दी ठळक झाली. प्रत्येक प्रसंग गर्दीने भारला जाऊ लागला. गिमिक्सचा मारा करीत डोळे दिपवण्याचे कौशल्य पणाला लागले. अभिनयात आंगिक, आहार्य वरचढ होऊ लागले. वाचीक अभिनयावर मेहनत घेणे बंद झाले. सहाजिकच या सर्वात लेखक पूर्णपणे गुदमरला. एकल नाटकातील साहित्यिक मूल्य हरवले. क्राफ्ट, आखीव, रेखीव, घोटीव, बांधेसूद साहित्यिक नाट्यानुभव एकांकिका विश्वातून हद्दपार होणार असतील तर हे सारे फक्त कागद आणि पेनाच्या सहाय्याने ‘प्रसवणारा’ लेखक घडणार कसा? स्वतःमधील लेखकाला घडवण्याची प्रक्रिया एकांकिकांमधून साध्य होत नसेल तर एकांकिका स्पर्धामधून फक्त लेखनिक तयार होतील लेखक नाही. भविष्यात चांगले लेखक घडावेत या कामी लेखकांसाठी खुला मंच ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
विशाखा कशाळकर प्रतिष्ठानच्या वतीने नोव्हेंबर २०२२पासून सुरु झालेल्या खुली एकांकिका वाचन मंच स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी होत आहेत. २७ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये या वर्षातील लेखकांसाठी पहिली खुली एकांकिका वाचन मंच स्पर्धा होणार आहे. नोव्हेंबर २०२२चं विजेतेपद नाशिकचे श्रीराम वाघमारे यांनी, तर डिसेंबर २०२२चं विजेतेपद मुंबईतील संकेत तांडेल यांनी पटकवल्यानंतर जानेवारी २०२३ मधील विजेतेपदाची माळ कोणत्या लेखकाच्या गळयात पडते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकांकिका पाठवण्यासाठी ई-मेल आयडी 01vishakha@gmail.com आणि अधिक माहितीसाठी शशांक खेडेकर – ९६६४०६६९३१, सागर पेंढारी – ७७१५९९०००९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत एकांकिका पाठवण्याचे आवाहन लेखकांना करण्यात आले आहे. भाग घेण्यासाठी विषय, शैली आणि वयाचे बंधन नाही. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही फी नाही. प्रेक्षकांसाठीही प्रवेश विनामूल्य आहे. या उपक्रमातील मराठी एकांकिकांमधून तीन एकांकिका वाचनासाठी निवडल्या जातील. प्रत्येक एकांकिका वाचनासाठी ४० मिनिटांचा अवधी दिला जाईल. दर एकांकिका वाचून झाल्यावर २० मिनिटांचा चर्चेचा अवधी असेल. या खुल्या चर्चेत प्रेक्षक, लेखक, सन्माननीय पाहुणे सारेचजण भाग घेतील. तीनही एकांकिका वाचून झाल्यावर सर्वोत्कृष्ट एकांकिकेची निवड करण्यासाठी तिन्ही एकांकिकांची सामायिक चर्चा होईल. चर्चेअंती गुप्त मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखकाची निवड होईल. अशा रीतीने दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा उपक्रम आयोजित होईल. १२ महिन्यांतील १२ सर्वोत्कृष्ट एकांकिकांचे एकत्रित पुस्तक प्रकाशित केले जाईल. हॉलबाहेर दर्जेदार पुस्तके, विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकमागे सर्वांना २०% ची भरघोस सवलत फक्त या उपक्रमाच्या निमित्ताने राजहंस प्रकाशन देत आहे. एकंदरीत हा मंच म्हणजे भपकेबाज सादरीकरणात हरवलेल्या संहिता लेखकांना त्यांचे मानाचे स्थान मिळवून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.