सचिन चिटणीस……
कोरोनाच्या महामारीतून आपण हळूहळू बाहेर पडत असून निर्बंधही शिथिल होत आहेत. चित्रपटगृह पन्नास टक्क्यांनी चालवायला सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या जवळजवळ अठरा महिन्यापासून चित्रपटसृष्टी बंद होती निर्बंध उठवल्यानंतर फक्त दोनच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असून लोकांनी त्यास संमिश्र असा प्रतिसाद दिला. मात्र तरी अजून जवळ जवळ पावणे दोनशे चित्रपट तयार असून ते आपल्याला थेएटर कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत, मात्र त्या मध्ये अर्ध्याहून अधिक निर्मात्यांकडे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जो पैसा लागतो तो नाही आहे. हातात पैसा उरला नसल्याने संपूर्णपणे तयार असलेला चित्रपट कसा प्रदर्शित करायचा हा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. कारण कित्येकांनी आपलं घर, जमीन, सोनं-नाणं विकून किंवा कर्ज घेऊन चित्रपट बनवले आहेत मात्र कर्जाची परतफेड करणे आता त्यांना मुश्किल झाले आहे त्यामुळेच तयार असलेला चित्रपट प्रदर्शित करताना येणारा खर्च कसा करायचा या विवंचनेत काही निर्माते पडले आहे याबाबतीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले “ही वस्तुस्थिती आहे, मात्र तरीही ज्यांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांनी महामंडळाकडे यावे महामंडळ त्यांना नक्कीच त्यातून मार्ग दाखवेल.
सध्या अक्षय बर्दापूरकर यांचा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्लॅटफॉर्म तसेच स्वप्निल जोशी यांचा ‘लेट्सफिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी चित्रपट घेण्यास उत्सुक आहेत. ज्या निर्मात्यांना आपले चित्रपट प्रदर्शित करण्यात अडचण येत होती असे चाळीस चित्रपट स्वप्निल जोशी यांनी आपल्या ‘लेट्सफिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म साठी घेतले आहेत. तसेच या चित्रपटांच्या अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला महामंडळातर्फे विशेष विनंती केली आहे. त्याचप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मना काही काळासाठी अनुदान देता आल्यास अधिकाधिक मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकत घेतले जातील, त्यामुळे जे निर्माते अडचणीत सापडले आहेत त्यांची अडचण दूर होण्यास मदत होईल असे मेघराज राजे भोसले यांनी ‘मुंबई न्यूज २४ x ७’ ला सांगितले.
कोरोना काळात तयार असलेले चित्रपट प्रेक्षकांना लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघावयास मिळतील अशी आशा करण्यास काहीच हरकत नाही.